“अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात तपास यंत्रणा मात्र…”; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणात किंग खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने देशभरात एकच गोंधळ निर्माण केला आहे. मात्र आता याच प्रकरणावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच संदर्भात बोलताना काँग्रेसने काही गंभीर आरोप केले आहेत.
कोर्डेलिया क्रूझवर सापडलेले अमली पदार्थ आणि आर्यन खानला झालेली अटक या प्रकरणावर भाष्य करताना काँग्रेसचे नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एनसीबीचे अधिकारी या क्रूझ प्रकरणातील कारवाईच्या माध्यमातून छोट्या माश्यांच्या मागे लागले आहेत. मात्र त्याचवेळी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात ही केंद्रीय संस्था शांत आहे, अशी टीका केली आहे.
“क्रूझवरील छोट्या माशांना पडकडण्यासाठी एनसीबी फार व्यस्त आहे. पण जेव्हा मोठ्या माशांची गोष्ट येते तेव्हा अदानींच्या मुंद्रा बंदरावरुन करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात एनबीसी एकदम शांत आहे. एनसीबी असा राजाश्रय (किंगपिन्स) असणाऱ्यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याला संरक्षण का देत आहे आणि कोणाच्या आदेशानुसार देत आहे?,” असे शमा यांनी म्हटले आहे.
NCB gets very busy arresting small fish on a cruise ship but when it comes to the biggest fish of them all- the 3000 kg heroin smuggled from Adani’s Mundra port, NCB is completely mum. Why is NCB protecting the kingpins of the organised Drug Cartel & on whose orders!
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) October 3, 2021
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८.२१९ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू आहे.
अदानी उद्योग समुहाची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडल्याने खळबळ उडाल्यानंतर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले होते. “बंदर चालवणाऱ्या कंपनीची भूमिका केवळ बंदरावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची आहे. आम्ही केवळ जहाजांना बंदरावरील सेवा देतो. मुंद्रा बंदरावरुन वाहतूक होणाऱ्या कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.”





