पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी “इंटर्नशिप आणि ऑन द जॉब ट्रेनिंग” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले, प्रमुख वक्ते दिनेश सिनफाल (मुख्य फार्मासिस्ट, एम.जे.एम. हॉस्पिटल, पुणे), बजरंग धुमाळ (झोनल सेल्स मॅनेजर, पोलन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड), अविनाश वेल्हाळ (डायरेक्टर – जेनेरिक औषध R&D, तेवा वॉटसन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड), आणि अमितकुमार माने (डायरेक्टर, मालन हेल्थ, पुणे) यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. विजया बर्गे, पदविका विभागप्रमुख डॉ. सुजित काकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली. प्रस्ताविकात प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील रोजगार संधी, आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि शैक्षणिक-औद्योगिक अंतर कमी करण्यासाठी इंटर्नशिप व ऑन द जॉब ट्रेनिंगचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. दिनेश सिनफाल यांनी रिटेल व होलसेल फार्मसी व्यवसायासाठी आवश्यक परवाने, हॉस्पिटल व कम्युनिटी फार्मसीमधील फार्मासिस्टची भूमिका आणि औषध रेकॉर्ड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. बजरंग धुमाळ यांनी फार्मास्युटिकल मार्केटिंगमधील संधी, कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रेरणा, आवड आणि वचनबद्धतेची गरज यावर प्रकाश टाकला. अमितकुमार माने यांनी सशुल्क व अंशदायी इंटर्नशिपद्वारे कौशल्यविकासावर मार्गदर्शन केले. अंजली डिव्होरे (प्रतिनिधी, लव्हेंडर लॅबोरेटरीज, पुणे) यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील उपकरणे आणि त्यांच्या हाताळणीसाठी आवश्यक कौशल्यांबाबत माहिती दिली. अविनाश वेल्हाळ यांनी मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल, मार्केटिंग क्षेत्रातील रोजगार संधी आणि व्यक्तिमत्त्व व सामाजिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यशाळेच्या समारोपात विद्यार्थी आणि वक्ते यांच्यात संवादी सत्र घेण्यात आले. या कार्यशाळेत औषधनिर्माण क्षेत्रातील २५ उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांना प्राचार्य आणि प्रमुख वक्त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यशाळेचे नियोजन प्राध्यापिका तृषा शांग्रपवार आणि दीपिका प्रजापती यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपिका प्रजापती आणि आभार प्रदर्शन बिल्वदा बैचे यांनी केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील करिअरच्या संधी समजून घेण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.