विविधा : डॉ. विनायक महादेव दांडेकर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक महादेव दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 6 जुलै 1920 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण नागपूर, पुणे व कलकत्ता येथे झाले. गणितातील कलकत्ता विद्यापीठाची एम.ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती. वर्ष 1945 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी कुमुदिनी याही अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक होत्या.
दांडेकर हे पुणे येथील ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’चे संचालक आणि लोणावळे येथील इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेचे संस्थापक-संचालक होते. आर्थिक विषयावरील संशोधनाबरोबरच अर्थशास्त्र व संख्याशास्त्राचे अध्यापनही त्यांनी केले होते. ते प्रभावी वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी आर्थिक विषयांवर 15 संशोधनपर ग्रंथ व सुमारे 90 निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांचा मूळ अभ्यास विषय संख्याशास्त्र हा असल्यामुळे त्यांचे अर्थशास्त्रीय लेखन मुद्देसूद आहे. दांडेकरांनी बहुतांशी लेखन इंग्रजीतून केले असले तरी त्यांनी मराठीतूनही महत्त्वाचे लेखन केले आहे. त्यांनी प्रामुख्याने भारतातील दारिद्य्रावर संशोधनात्मक लेखन केले आहे. शेती, सहकार, अन्नधान्ये, लोकसंख्या, छोटे उद्योगधंदे, भारताची आर्थिक परिस्थिती, शेतीविषयक कायदे यावर सामान्य वाचकाला समजेल असे लेखन केले.
दांडेकरांची लेखणी सर्वस्पर्शी होती, त्यामधे उपहास, उपरोध, व्याजोक्ती, ऊनोक्ती यांचा वापर खुमासदार पद्धतीने करीत. गोमाता की गोधन?, भारतीय बुद्धिमंतांची निर्यात, ललाटरी (सरकारी सोडती) इत्यादी त्यांचे लेख गाजले. गरिबी हटाव : पण कशी?, भिक्षापात्र अवलंबिणे, शेतजमीन धारणेवरील कमाल मर्यादेच्या निमित्ताने, शेतीस पाणी : पाटाने की उपसा करून?, सेक्युलॅरिझम: अन्वय आणि अर्थ, पारतंत्र्याचा नवा आविष्कार, भारतीय शेतीपुढील जुन्या व नव्या समाजवादी समस्या असे लेख त्यांनी लिहिले.
पॉव्हर्टी इन इंडिया (सहलेखक : डॉ. नीलकंठ रथ) हा त्यांचा आर्थिक विषयावरील इंग्रजीमधील एक महत्त्वाचा व गाजलेला ग्रंथ. त्याचा मराठी अनुवाद भारतातील दारिद्य्र (1973) या शीर्षकाने पुण्याच्या समाज प्रबोधन संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
विदर्भवाद्यांच्या दबावामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक अर्थशास्त्रीय विषमता व असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 जुलै 1983 रोजी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली. या समितीस महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलावरील सत्यशोधन समिती असे म्हटले जाते. या सत्यशोधन समितीच्या अहवालावर आधारित महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील असमतोल दूर करण्याकरिता उपाययोजना व ठोस कार्यक्रम सूचविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण व उर्वरित महाराष्ट्राकरिता 4 स्वतंत्र समित्याही स्थापन करण्याचे शासनाने ठरविले.त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाची निर्मिती करण्यामागे देखील शासनाने आपल्या प्रस्तावात नियोजनासाठी जिल्हा हा पायाभूत घटक मानावा व प्रत्येक जिल्ह्यासाठी दीर्घ दृष्टीने यथार्थदर्शी योजना तयार करावी असे ठरविले, महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचे काम वि. म. दांडेकर यांनी केले. 31 ऑगस्ट 1995 रोजी त्यांचे निधन झाले.





