लक्षवेधी : रशियाची कर्करोगविरोधी लस

– प्रा. डॉ. संजय वर्मा
सुमारे अडीच-पावणेतीन वर्षांपासून युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या रशियात कॅन्सर प्रतिबंधक लस तयार झाल्याची बातमी ही आश्चर्यकारक घटना म्हणावी लागेल. यासंदर्भातील घोषणा स्वत: रशियाने केली आहे.
रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरने यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली. अर्थात, कॅन्सर प्रतिबंधक लस कितपत प्रभावी ठरेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. जगभरातील अन्य देशांत या लशीची चाचणी होईल, तेव्हा त्याची कसोटी होईल. पण तूर्त ही लस म्हणजे केवळ 2024 मधीलच नव्हे तर गेल्या दशकभरातील वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील सर्वांत मोठे यश म्हणावे लागेल.
2025 मध्ये रशियातील सर्व नागरिकांना ही लस मोङ्गत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कॅन्सर या आजारावर सर्वंकष उपचार नसल्याचे मानले जात होते. कालांतराने बर्याच औषधोपचारानंतर काही प्रमाणात त्यापासून मुक्ती मिळू लागली. पण आता रशियाने थेट लस विकसित केल्यामुळे या दुर्धर आजाराचा प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. अर्थात, रशियाच्या लसीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित राहू शकतो. कारण अलीकडील काळात अशा प्रकारच्या दाव्यांचे पीक आले आहे. अशा स्थितीत रशियाची लस खरोखरच विश्वासपात्र आहे का? असा प्रश्न लोक विचारू शकतात.
असे असले तरी रशियन लस किङ्गायतशीर दरात उपलब्ध झाली तर नागरिक डोळे झाकून लसीकरण करून घेतील, यात शंका नाही. यासंदर्भात मागचे एक उदाहरण देणे संयुक्तिक ठरेल. करोनाचा वेगाने प्रसार झाल्याने त्याला रोखण्यासाठी रशियाने स्पुटनिक व्ही लस तयार केली. ही लस सर्वप्रथम अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी घेतल्यामुळे रशियाच्या लशीवरचा विश्वास वाढला. कदाचित याहीवेळी पुतीन तोच प्रयोग करतील आणि त्यामुळे जगातील नागरिक या लशीवर विश्वास ठेवतील आणि या आधारे असाध्य समजल्या जाणार्या कर्करोगावर परिणामकारक उपचार सापडला, असे म्हटले जाईल.
विशेष म्हणजे ‘द सायंटिस्ट’ या संकेतस्थळाच्या मते, पंधरा वर्षांपूर्वी न्यूयॉर्क येथे बायोटेक कंपनीने एप्रिल 2008 मध्ये रशियात पहिली कर्करोगावरील लस विकसित होणार असल्याचे जाहीर केले होते आणि त्यास मंजुरी मिळाल्याचे नमूद केले. एखाद्याच्या देशाच्या कर्करोग रोखणार्या लशीच्या निर्मितीला एका नियामक संस्थेने परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ होती.
अर्थात त्यानंतर दहा वर्षांत या लशीचा विकास कुठपर्यंत झाला, हे समजू शकले नव्हते. मात्र ङ्गेब्रुवारी 2024 मध्ये ‘मॉस्को ङ्गोरम ऑन फ्यूचर ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजी प्रोग्रॅम’मध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी कर्करोग प्रतिबंधक लस लवकरच आणली जाईल, अशी घोषणा केली. मात्र ही लस रशियाबाहेरील जनतेला कधी मिळणार आणि ही लस कोणत्या प्रकारातील कर्करोग रोखण्यास सक्षम असेल याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेले नाहीये.
विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, ही लस एमआरएनए प्रकारातील आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारात पारंपरिक लस तयार करताना आजाराला रोखण्यासाठी आजार निर्माण करणार्या संसर्गाचा किंवा त्याच प्रकारातील विषाणूचा वापर केला जातो. ङ्गरक एवढाच की कर्करोगाच्या पेशीच्या पृष्ठभागावरील निरुपद्रवी प्रथिने (हार्मलेस प्रोटिन) वेगळे केले जातात आणि त्याला अँटीजेन म्हणून ओळखले जाते. हे अँटीजेन लस निर्मिती प्रक्रियेत आरोग्य चाचणीच्या (क्लिनिकल ट्रायल) काळात मानवी शरीरात सोडले जातात.
या आधारे परिणामकारक अँटीबॉडी विकसित करण्याच्या हेतूने रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय केली जाते. ‘एमआरएनए’ लशीत संक्रमक भूमिकेत असलेले आरएनएच्या एक लहान तुकड्याचा वापर केला जातो आणि त्याच्या मदतीने शरीरातील पेशींना कर्करोगाच्या पेशीशी संबंधित एक विशिष्ट प्रोटीनची निर्मिती करण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे रशियन लशीकडे जग उत्सुकतेने पहात आहे.
कर्करोगापासून बचाव आणि प्रतिबंध करण्याच्या दिशेने लस तयार करणारा रशिया एकमेव देश नाही. ब्रिटन आणि जर्मनीसह अनेक देशांतील बायोटेक कंपन्यांनी कर्करोगाविरुद्ध परिणामकारक औषधी आणि लस विकसित करण्यात युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. ब्रिटिश सरकार जर्मनीची प्रसिद्ध औषध कंपनी बायोटेकसह एकत्रपणे काम करत कर्करोगाच्या उपचारासाठी लसीची क्लिनिकल ट्रायल करत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत दहा हजार कर्करोगग्रस्तांना त्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
दुसरीकडे अमेरिकेची मॉडर्ना, मर्क ङ्गार्मा कंपनी त्वचेच्या कर्करोगाच्या (स्किन कॅन्सर) एका प्रायोगिक लशीवर काम करत आहेत. या लसीचे प्रारंभीचे निष्कर्ष सकारात्मक सांगितले जात आहेत. या अभ्यासाशी संबंधित दाव्यानुसार या लशीने तीन वर्षांच्या उपचारानंतर त्वचा कर्करोगाचे एक घातक रूप मेलेनोमामुळे होणार्या मृत्यूची शक्यता ही निम्म्याने कमी केली. या शिवाय अन्य सहा लशींवर देखील काम सुरू आहे. या लसी ह्यूमन पेपिलोमा व्हायरसला (एचपीव्ही) रोखू शकतात. ही लस सर्व्हायकल (गर्भाशय) कर्करोगासह काही अन्य प्रकारच्या कर्करोगापासून नागरिकांचा बचाव करू शकते.
आणखी एक उदाहरण कर्करोगावरील एओएच1996 नावाच्या औषधाचे मानवावर घेतलेल्या चाचणीचे आहे. त्याची चाचणी सप्टेंबर 2023 पासून अमेरिकेत केली जात आहे. या औषधाचे नाव 1996 मध्ये जन्मलेली मुलगी आना ओलिविया होलीच्या नावाने प्रेरित आहे. तिला न्यूरोब्लास्टोमा नावाचा सामान्यपणे मुलांना होणारा कर्करोगाचा आजार झाला आणि त्यात तिचा 2005 मध्ये मृत्यू झाला. पोट, छाती आणि घशातील हाडांत होणार्या या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्या या औषधाचे नाव तिच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले. शास्त्रज्ञांच्या मते, हे औषध आरोग्यदायी पेशींची हानी न करता कर्करोगाच्या ट्यूमरला मुळासकट बाहेर काढण्याचे काम करू शकते.
रशियाने कर्करोगाविरुद्धची लस आणल्याने भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आपला देश कर्करोगाची राजधानी होण्याकडे वाटचाल करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्रत्येक दहापैकी एका नागरिकास संपूर्ण आयुष्यभरात कर्करोग होण्याची शक्यता असते आणि ही गंभीर चिंतेची बाब आहे. भारतीय आरोग्य संशोधन परिषद-राष्ट्रीय कर्करोग रजिस्ट्री कार्यक्रमाच्या आकलनानुसार, 2022 मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 14 लाखांपेक्षा अधिक असून ती आता 2025 मध्ये वाढत 16.7 लाख होण्याची शक्यता आहे.
2022 मध्ये कर्करोगाची जी नवीन प्रकरणे समोर आली, त्यात 7.22 लाख महिला तर 6.91 लाख पुरुषांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. भारतात 2022 मध्ये 9.16 लाख रुग्णांचा कर्करोगाने मृत्यू झाला. हे आकडे भारताला कर्करोगाची राजधानी करणारे आहेत. ‘द लॅन्सेट’च्या अहवालानुसार, दरवर्षी तंबाखू खाण्याने भारत, चीन, ब्रिटन, ब्राझील, रशिया, अमेरिका आणि दक्षिण आङ्ग्रिकेत सुमारे 13 लाख जणांचा मृत्यू होतो. ही संख्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडणार्या एकूण संख्येच्या निम्मी आहे. याचा त्रास केवळ भारतच सहन करत नाहीये; तर जगातील प्रत्येक सहावा मृत्यू हा कर्करोगामुळे होताना दिसत आहे. अशा वेळी रशियाची लस भारतासह सर्व जगाला उपलब्ध झाल्यास ती वरदान ठरणार आहे.





