इंटर मिलानचा ब्रासियावर दणदणीत विजय

इटालियन सिरीज ए फुटबॉल स्पर्धा
मिलान – इटालियन लीग सिरीज ए फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलान संघाने ब्रासिया संघाचा 6-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंटर मिलानने अटलांटाला पिछाडीवर टाकत स्पर्धेच्या क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले.
हा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. सामन्याच्या 5 व्या मिनिटालाच ऍश्ले यंगने गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर एलिक्स सॅंचेजने 20 व्या तर, डॅनियल डी ऍम्ब्रोसियोने 45 व्या मिनिटाला गोल करत पहिला हाफ संपताना संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी प्राप्त करून दिली. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतरही ब्रासिया संघाला गोल करण्यात यश आले नाही. रॉबर्टो मॅग्लेरडीनीने 52 व्या, क्रिस्टियन एरिक्सनने 83 तर, ऍन्टोनियो कार्डेने 88 व्या मिनिटाला गोल करत इंटर मिलानला 6-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला.
इंटर मिलानने 4 कॉर्नर वाया घालवले तर पंचांनी एक ऑफसाइड घोषित केल्यामुळे त्यांना जवळपास 5 गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, ती वाया गेली. एलिक्स सॅंचेजने केलेला गोल या संपूर्ण सामन्यात लक्षवेधी ठरला. या सामन्यातील विजयासह इंटर मिलानने स्पर्धेतील क्रमवारीत 64 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. या क्रमवारीत युवेंन्टस 72 गुणांसह पहिल्या तर, लेजिओ 68 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.





