Pune District | अरिहंत महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा

पिरंगुट: -बावधन (ता. मुळशी) येथील अरिहंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे शहर विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अरिहंत महाविद्यालयाच्या पटांगणावर कुस्ती स्पर्धा झाली.
आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर व महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे शहरातील विविध महाविद्यालयातून 75 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल व मुली या प्रकारात विविध वजनगटातील कुस्तीगीरांनी खेळाचे कौशल्य दाखविले. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी निवड समितीचे सदस्य डॉ. गुणवंत सांगळे, प्रा. राजेंद्र कदम, प्रा. प्रसाद त्रिकोणे व प्रा. अभिजीत परसे यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचे नियोजन अरिहंत महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विक्रम पवळे यांनी केले. अरिहंत महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. अशोक चासकर, प्राचार्य डॉ. मंगेश ताकपिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पंच म्हणून रवींद्र बोत्रे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आमले, चंद्रकांत मोहोळ, निलेश मारणे, अमित मस्के यांनी काम पाहिले.





