आशा स्वयंसेविकांना विमा कवच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी महत्वाचा निर्णय घेत त्यांना दिलासा देण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत आता राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच ऑनड्यूटी असताना अपघात होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकारही अॅक्शन मोडवर आले आहे. आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. तसेच ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही योजना पुढे सुरु ठेवण्यात येणार असून मेंढपाळ लाभार्थ्यांना आता रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज कोणते निर्णय घेण्यात आले?
– ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ योजना कायम राहणार
– आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान
– शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार
– दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आता आरक्षण धोरण राबविणार
– बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर देण्याचा निर्णय
– अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय





