राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा कवच

पुणे – दहीहंडी उत्सव किंवा प्रो-गोविंदा लिगमधील सहभागी गोविंदाना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटनेची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होता. त्यामुळे आता राज्यातील दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 50 हजार गोविंदाना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याच्या आयोजनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने गोविंदांच्या मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास शासन निर्णयान्वये साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत व गोंविदा उत्सवाच्या आयोजनाच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपयायोजनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
यानुसार जखमी गोविंदाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याबाबत सूचना जारी केलेल्या आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून प्रति गोविंदा 75 रुपयांचा विमाहप्तानुसार एकुण 37 लाख 50 हजार रुपयांचा निधी संबंधित विमा कंपनीस दिला जाणार आहे.
सन 2022 मध्ये दहीहंडी उत्सवापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना विमा संरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी दहीहंडी उत्सव अत्यंत नजीक असल्याने व कमी कालावधीत विमा उतरवण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे अपघातग्रस्त गोविंदांसाठी त्यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिह सहाय्य करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय त्याच वर्षापुरता घेण्यात आला होता. सन 2023 मध्येही या निर्णय लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
असे आहेत फायदे
अपघाती मृत्यू झाल्यास: कुटुंबीयांना 10 लाख रुपये
दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास : 10 लाख रुपये
एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास : 5 लाख रुपये
कायमस्वरुपी पूर्ण अंपगत्व आल्यास : 10 लाख रुपये
अपघातामुळे रुग्णालयीन खर्चासाठी : 1 लाख रुपये





