महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, बोम्मईंनी मुक्ताफळे उधळणे बंद करावे – मंत्री विखे पाटील

पुसेगाव(प्रतिनिधी) – सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई मुक्ताफळे उधळत आहेत. ती त्यांनी बंद करावीत. महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही. तसेच आपली एक इंचही जमीन त्यांना देणार नाही, असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज अमृतमहोत्सवी रथपूजनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. राहुल कुल, ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, “”महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादात आता पंतप्रधान मोदींनी लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सरकार सीमावासीयांच्या पाठिशी ठाम आहोत.” नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळविले आहे. यापुढील निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनावरांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तिसऱ्या बुस्टर डोस द्यायची व्यवस्था केली जात आहे. युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने लम्पीचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शेतकऱ्यांचे कोलमडलेले अर्थकारण आता रुळावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे सरकार फेब्रुवारीत पडणार या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याची विखे पाटील खिल्ली उडविली.
ते म्हणाले, “”राज्यात पोपटपंची करणारे राजकीय ज्योतिषी उदंड झाले आहेत. शिंदे गट- भाजप युती सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे ही बेताल वक्तव्ये होऊ नयेत.’ सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.
शेतकऱ्यांसाठी लागेल ती मदत करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. सेवागिरी रथोत्सवासाठी मुख्यमंत्री येणार होते. मात्र, अधिवेशन आणि पुरवणी मागण्या सुरु असल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांच्यावतीने आम्ही सर्वजण पुसेगावला आलो असल्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम दबावाखाली; लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी रणांगणात उतरणार – आमदार शिंदे
आजपर्यंत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या आणि येथील विकासकामांबाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन काम केले आहे, असे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले. येथील भक्त निवास आणि इतर विकासकामांसाठी प्रयत्न केले आहेत. देवस्थानच्या जागेच्या प्रश्नीही निर्णायक प्रयत्न आपण केले होते. यापुढेही लागेल ती मदत करण्याची भूमिका घेऊन श्री सेवागिरी चरणी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आ. जयकुमार गोरे यांनी नमूद केले.





