Pune : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच!

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील, तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करावे किंवा स्वतंत्र राहावे, की अगदी दोन राष्ट्रवादी विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल. कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे, हेच माहिती नाही, असे म्हणत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.
सिंचन भवन येथे आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, असे विचारले असता, विखे पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे आणि आता जर ते एकत्र येत असतील, तर आम्ही आक्षेप घ्यावा, असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यावा.
शरद पवार यांच्याशी चर्चा
आमदार उत्तम जानकर यांची माहिती
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, तर ताकद वाढेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले. सोलापूरचे आम्ही चार आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो, तसेच शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले.
सिंचन भवन येथे आमदार जानकर बोलत होते. ते म्हणाले, की अजित पवार यांच्यावर टीका करूनही, त्यांनी मला नेहमी विकासकामांत साथ दिली. माझ्या मतदारसंघात कामे केली, पाणी दिले. माझ्या मतदारसंघात कामे करताना त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. मतदारसंघात काम असतात, अडचणी असतात, त्यामुळे सरकारची गरज असतेच. मात्र, शेवटी शरद पवार हे जे निर्णय घेतील तो अंतिम असेल, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.





