Nagar : जलसंपदामंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

राहाता : जलसंपदा मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या २६ व्या पदवीदान समारंभामध्ये ही पदवी पदान केली जाणार आहे.
मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित केले होते.
विखे पाटील यांनी आपल्या राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्वपूर्ण पदांवर काम करून सामाजिक हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राध्यान्याने कृषि व पणनमंत्री असताना शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्यांदा राज्यात सुरू करून शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांना त्यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले होते. आरोग्य क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, प्रवरा मेडीकल ट्रस्ट या माध्यमातून समाजासाठी आरोग्याच्या सुविधाही त्यांनी निर्माण केल्या.
जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगटांची चळवळ सुरू करून, ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी आणि लखपती दिदि योजनेतून अर्थसहाय्य करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचा चांगला पुढाकार राहिला आहे. मंत्री विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.





