तालिबानी राजदूताकडून इराणच्या राष्ट्रगीताचा अवमान

तेहरान – इराणी राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल इराणने तालिबानी राजदूताकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इराणचे राष्ट्रगीत सुरू असताना तालिबानी राजदूत उठून उभे न राहिल्याबद्दल इराणने ही नारीजी व्यक्त केली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये आयोजित इस्लामी ऐक्य परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी तालिबानी प्रतिनिधी आले असताना ही घटना घडली.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अफगाणिस्तानच्या हंगामी सरकारच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना पाचारण करून तालिबानी प्रतिनिधी अजीझोरहमान मन्सूर याच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाण राजदूताची ही कृती अपारंपरिक आणि अस्वीकार्य कृती असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी बुधवारी पाकिस्तानमध्येही एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या राष्ट्रीताच्यावेळी तालिबानचे सदस्य उभे राहिले नव्हते. त्याबद्दल पाकिस्ताननेही नाराजी व्यक्त केली होती. मात्र जेंव्हा संगीत वाजवले जात असते, तेंव्हा खाली बसणेच आपल्या देशाची रित आहे, असे स्पष्टिकरण तालिबानी सदस्यांनी दिले आहे.





