#INDvSL | दुय्यम संघ पाठवून बीसीसीआयकडून अपमान

कोलंबो – श्रीलंका दौऱ्यावर दुय्यम संघ पाठवून बीसीसीआयने एक प्रकारे श्रीलंका क्रिकेट मंडळाचा व खेळाडूंचा अपमानच केला आहे, अशा शब्दांत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने ताशेरे ओढले आहेत. तसेच या मालिकेत खेळण्यास तयार झालेल्या श्रीलंका क्रिकेट मंडळावरही त्याने टीका केली आहे.
जेव्हा एका देशाचा संघ अन्य देशाचा दौरा करतो, त्यावेळी प्रमुख खेळाडूंचाच संघ खेळवण्यावर भर असतो. इथे मात्र, बीसीसीआयने दुय्यम संघ पाठवून श्रीलंका मंडळासह सर्व खेळाडूंचाही अपमान केला आहे. या मालिकेत खेळण्याची किंवा या मालिकेच्या आयोजनाची तयारी दर्शवून श्रीलंका मंडळानेही आत्मसन्मानापेक्षा पैशालाच महत्त्व दिल्याचे यातून दिसून येते, असेही रणतुंगाने सुनावले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर दाखल झाला आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रत्येकी 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
श्रीलंकेत दाखल झालेला हा भारताचा दुय्यम संघ आहे आणि त्याचे येथे येणे हा आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टीव्ही मार्केटिंगची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्याशी खेळण्यास तयारी दाखवणाऱ्या श्रीलंका मंडळाचीही चूक आहे. भारताने त्यांचा सर्वोत्तम संघ इंग्लंडला पाठवला आहे, तर कमकुवत संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवला आहे, असेही रणतुंगा म्हणाले.





