nagar | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी संस्थेने प्रशिक्षण घ्यावे : सुधाकर बोराळे

नगर, (प्रतिनिधी) – कृषी पतसंस्था ही कृषी कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करते. त्यांच्या पाठीशी उभी राहते, हा मोठा आधार आहे. पतसंस्थेचा एक चांगला हेतू आहे. कर्मचारी जेव्हा सेवेत असतो, तेव्हा त्याचा सेवेत रुजू असल्यापर्यंतचे नियोजन असते. परंतु सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियोजन नसते. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी योग्य गुंतवणूक करण्यासाठी पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुणवंत पाल्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गुणगौरव समारंभात बोराळे बोलत होते. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्ष जयश्री कुटे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी कृषी सहसंचालक किरण मोरे, प्र. उपविभागीय कृषी अधिकारी सुधीर शिंदे, अमोल काळे, विलास नलगे, राजकुमार वाणी,
संस्थेचे मार्गदर्शक अनिलकुमार शेजूळ, कविता मदने, विश्वास तोडमल, बाळासाहेब आठरे, नवनाथ जत्ती, प्रतीक कांबळे, सुनील आडसूळ, युनूस बेग, मिनीनाथ बेलेकर, बाळासाहेब काकडे, जालिंदर गांगर्डे, राहुल आठरे, सचिन आव्हाड, मुकुंद साबळे, शिवप्रसाद कोहकडे, आशिष दिवटे, जयवंत गदादे आदींसह सर्व संचालक मंडळ, गुणवंत पाल्य व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
बोराळे म्हणाले, पतसंस्थेला जुना इतिहास असून, स्थापना १९५०ची आहे. प्रथम जयश्री कुटे यांच्या रूपाने महिला संचालकास चेअरमनपदाची संधी संचालक मंडळाने दिली. गुणवंत पाल्यांचा गौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष जयश्री कुटे यांनी संस्थेची सभासद संख्या ८९४ असून, सर्वांचे सहकार्य व तुम्हा सर्वांनी आमच्यावर टाकलेला विश्वासाच्या शिदोरीवर आपली संस्था आजअखेर यशस्वी वाटचाल करीत आल्याचे सांगितले. परस्परांवर विश्वास ठेवून, सहकार्यातून एकमेकांचा विकास घडविणारी आपली संस्था आहे. चढत्या क्रमाने वाढलेले भागभांडवल, सभासदांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा, संस्थेकडे जमा होत असलेल्या ठेवी, सभासदांना वाटलेला लाभांश व आतापर्यंत कमीत कमी केलेला सभासद कर्ज व्याजदर यामुळे संस्था प्रगतिपथावर आहे.





