पिंपरी | प्रतिज्ञापत्रासाठी शंभरऐवजी मोजावे लागणार पाचशे

नाणे मावळ, {अतुल चोपडे-पाटील} – विविध शासकीय योजना, शैक्षणिक क्षेत्रातील योजना यांचे लाभ घेण्यासाठी, तसेच जमीन विषयक कागदपत्रे, विविध दाखले – प्रमाणपत्रे काढण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतात.
हेच प्रतिज्ञापत्रक बनविणे आता महागले आहे. यापुढे प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी थेट ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नागरिकांना खरेदी करावा लागणार आहे. शासकीय शुल्कात चौपट वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून दि.१४ आॅक्टोबरपासून या वाढीची अंमलबजावणी सुरु केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता प्रतिज्ञापत्र करण्यासाठी थेट चौपट म्हणजे ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. १००, २००, ३०० रुपयांच्या स्टॅम्पवर करण्यात येणारे दस्त शासनाने बंद करून थेट शंभरऐवजी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नागरिकांना खरेदी करावा लागणार आहे.
पूर्वी सामान्य नागरिकाला कुठलेही शासकीय, निमशासकीय काम करीत असताना शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर हा प्रतिज्ञापत्र, करारनामा करिता लागत होता.
परंतु यात वाढ झाली. पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर केल्याने याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे शासनाने १०० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा बॉण्ड करण्याबाबत घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
इथे हवा असतो स्टॅम्प पेपर…
दहावीपासून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच प्रतिज्ञापत्र हे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावे लागत होते. ते आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावे लागणार आहेत.
विविध भाडे करार, गॅप प्रमाणपत्र, जात पडताळणी, नाव दुरुस्त, विसर पावती, घटस्फोट, अन्यप्रकारचे करारनामे व जे शासकीय दस्त पूर्वी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केले जात होते, तेही आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावे लागणार आहेत.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आजच्या युगामध्ये शिक्षण मुळात महागले आहे.
त्यात आता कोणत्याही योजना किंवा कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करताना शंभर ऐवजी पाचशे रुपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागतील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बाब त्रासदायक आहे. – अंकुश रामचंद्र चोपडे, सामान्य नागरिक





