Pune District : मोरगाव-मुर्टीतील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
Pune District : मोरगाव-मुर्टी परिसरात यंदा अपेक्षित पावसाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी राहिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून,उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

वडगाव निंबाळकर : मोरगाव-मुर्टी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील पाणीटंचाई,शेतीसाठी उपलब्ध असलेले पाणी,पिकांची परिस्थिती तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न याबाबत शेतकरी व ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेण्यात आली.
मोरगाव-मुर्टी परिसरात यंदा अपेक्षित पावसाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी राहिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून,उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी दौऱ्यावेळी परिसरातील विविध गावांचे सरपंच,ग्रामपंचायत पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,अधिकारी,शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावागावातील पाणीप्रश्न,शेतीची सद्यस्थिती,पिकांना आवश्यक असलेले पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत उपस्थितांनी कृषिमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली.
यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मोरगाव-वडगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले),बारामती पंचायत समिती सभापती किरण तावरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,विविध गावांचे सरपंच,अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यात आली.शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता, पिकांची अवस्था आणि आगामी काळातील संभाव्य अडचणी याबाबत माहिती दिली.परिस्थितीची पाहणी केल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षाही शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केली. आगामी काळात या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का,याकडे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





