पुणे जिल्हा | पांचाळे खुर्द येथे शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पांचाळे खुर्द येथे जमिनीला भेगा पडल्याने त्याची पाहणी शासकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करून तेथील ग्रामस्थांना धीर दिला आहे.
या संदर्भात लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
पश्चिम आदिवासी पांचाळे खुर्द येथे २००३ ची पुनरावृत्ती झाली आहे. गावच्या समोर दोन्ही बाजूला मोठ्या भेगा व खराळ पडल्याने गाव कधी पण धरणात विलीन होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन पाहणी करण्यास सांगितले होते.
माळीण येथे कार्यक्रम झाल्यानंतर प्रात गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार अंनत गवारी, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप,
अमोल अंकुश, भीमाशंकर कारखान्याचे संचालक सीताराम लोहट यांनी ग्रामस्थांसह पाहाणी केली. पांचाळे खुर्द गाव हे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या अशंत: बाधित क्षेत्रातील गाव आहे. ४५ कुंटुबे येथे राहत आहेत.
या गावाच्या पुनर्वसनासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. तरीही गावाचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. २००३ ला या गावात अशाच प्रकारची जमिनीला भेगा जाऊन परिस्थिती घडली होती.
त्याची पुरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २५ ते २७ जुलै रोजी या तीन दिवसाच्या अति मुसळधार पावसाने झालेली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ हे भयभीत झालेली आहेत. येथील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे व त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे ही महत्त्वाची गरज असताना प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला.
माळीण होण्याची वाट पाहता काय?
आदिवासी पांचाळे खुर्द येथे गावच्या समोर दोन्ही बाजूला भेगा पडल्या आहेत. गाव कधी पण धरणात विलीन होऊ शकते.
तर घरामध्ये पाण्याचे पाझर आहेत. शासन आमची माळीण होण्याची वाट पाहता का व पुनर्वसन करणार नसाल तर आम्हीं उपोषण करणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पिलाजी गारे व संदीप गारे यांनी दिली.





