Iran Kharg Island: इराणचे आर्थिक हृदय अमेरिकेच्या निशाण्यावर; मध्यपूर्वेत नव्या संकटाची चाहूल
Iran Kharg Island: खार्गच्या तेल क्षमतेवर थेट हल्ला झाल्यास तीव्र प्रतिशोध होण्याची शक्यता असून त्यातून प्रादेशिक ऊर्जायुद्ध भडकू शकते. असे झाल्यास आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या आशियाई अर्थव्यवस्थांना, विशेषतः भारताला, याचा मोठा फटका बसेल.

Iran Kharg Island: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले की, अमेरिकन हवाई दलाने इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. उत्तर पर्शियन आखातात वसलेले हे २२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे खार्ग बेट ‘फोर्बिडन आयलंड’ म्हणून ओळखले जाते. अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेले हे बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
खार्ग बेट इतके महत्त्वाचे का?
खार्ग बेटावरून इराणच्या एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी तब्बल ९० टक्के म्हणजेच दरवर्षी सुमारे ९५ कोटी बॅरल तेलाचा पुरवठा होतो. तज्ज्ञांच्या मते इराणच्या किनारपट्टीवरील उथळ पाण्यामुळे मोठे तेलवाहक जहाज इतरत्र थांबू शकत नाहीत, म्हणून हे बेट विशेषतः विकसित करण्यात आले. हे बेट इराण सरकार आणि लष्कराच्या वित्तपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. हे ‘मुकुटमणी’ गमावल्यास इराण एक आधुनिक राष्ट्र म्हणून कार्यरत राहण्याची क्षमताच संपुष्टात येईल.
काय उद्ध्वस्त केले, काय वाचवले?
इराणच्या फार्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या हल्ल्यादरम्यान बेटावर १५ हून अधिक स्फोट झाले. सैन्याची संरक्षण सुविधा, सागरी तळ, हेलिकॉप्टर नियंत्रण मनोरा आणि हेलिकॉप्टर वाहक जहाज या लष्करी लक्ष्यांवर हल्ले झाले. आखातावर धुराचे लोट उठत असताना तेल पायाभूत सुविधा मात्र या हल्ल्यात शाबूत राहिल्या. तरीही ह्युस्टन विद्यापीठाचे ऊर्जा अर्थतज्ज्ञ एड हिर्स यांनी अल जझीराला सांगितले की, बेट इतके लहान असल्याने तेल निर्यात यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नाही असे म्हणणे कठीण आहे. इराणी सैन्याने हल्ल्यानंतर एका तासात संरक्षण यंत्रणा पुनःसक्रिय केल्याचा दावा केला आहे.
होर्मुझसाठी अमेरिकेचा इशारा
या हल्ल्यामागे होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणे हा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट होते. या अरुंद जलमार्गावर नाकेबंदीची धमकी देऊन इराणने जागतिक ऊर्जा बाजाराला वेठीस धरले आहे. ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर थेट इशारा दिला की, यावेळी तेल सुविधा वाचवल्या आहेत; परंतु इराणने जहाजांच्या मुक्त वाहतुकीत अडथळा आणत राहिल्यास या निर्णयाचा ‘तात्काळ फेरविचार’ केला जाईल.
हेही वाचा – होर्मुझ सामुद्रधुनी 3-4 आठवड्यांत न उघडल्यास जागतिक बाजारात मोठे संकट – तज्ज्ञांचा इशारा
इराणच्या प्रत्युत्तराचा धोका
तेहरानने या हल्ल्यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. इराणी लष्कराने इशारा दिला आहे की, खार्ग बेटावरील तेल सुविधांवर हल्ला झाल्यास परिसरातील अमेरिकाधार्जिण्या तेल प्रकल्पांवर मोठे प्रत्युत्तर दिले जाईल. या संघर्षाची झळ सौदी अरेबिया आणि कतारपर्यंत पोहोचण्याची भीती आहे; या देशांवर आधीच काही छोटे हल्ले झाल्याच्या बातम्या आहेत. जेपी मॉर्गनच्या जागतिक कमोडिटी संशोधन पथकाने इशारा दिला आहे की, खार्गच्या तेल क्षमतेवर थेट हल्ला झाल्यास तीव्र प्रतिशोध होण्याची शक्यता असून त्यातून प्रादेशिक ऊर्जायुद्ध भडकू शकते. असे झाल्यास आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या आशियाई अर्थव्यवस्थांना, विशेषतः भारताला, याचा मोठा फटका बसेल.
दरम्यान, आता जगाचे लक्ष या संघर्षाच्या दिशेकडे लागले आहे. अमेरिकेने खार्गवरील लष्करी संरक्षण खिळखिळे केल्यास बेट ताब्यात घेण्यासाठी सैन्य पाठवण्याचा पर्यायही समोर येऊ शकतो. मात्र इराणला आपल्या आर्थिक अस्तित्वाला धोका वाटल्यास होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचे अस्त्र वापरून आंतरराष्ट्रीय संकट ओढवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.





