Strait of Hormuz: होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनी पुढील तीन ते चार आठवड्यांत पुन्हा सुरळीत न झाल्यास जागतिक तेल बाजारात आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल, असा गंभीर इशारा ‘अलेथिया कॅपिटल’चे ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट जोनाथन विल्मोट यांनी शनिवारी दिला. मनीकंट्रोलच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले. होर्मुझमधून जगाचे २० टक्के तेल-गॅस पुरवठा Strait of Hormuz होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हा मार्ग बंद पडला आहे. इराणने अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल अनेक आखाती देशांचे तेलवाहक जहाज (टँकर्स) आणि तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे समुद्री जहाजे या मार्गाचा वापर करण्यास धजावत नाहीत आणि कच्च्या तेलाच्या व वायूच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. बाजारात अनिश्चितता कायम राहणार Strait of Hormuz विल्मोट म्हणाले की, सध्याची परिस्थिती अनिश्चित असली तरी ती कधीही बदलू शकते. अमेरिकेने पुढील काही दिवसांत लष्करी वरचढ मिळवली तरी बाजारातील कमजोरी दीर्घकाळ टिकेल. तेल बाजाराच्या दृष्टीने होर्मुझ पुन्हा उघडण्याचा ठोस आराखडा येईपर्यंत परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कच्चे तेल १५० डॉलरवर जाण्याची भीती Strait of Hormuz सध्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचला आहे. होर्मुझ बंद राहिल्यास हा भाव थेट १५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. भारत आपल्या ८० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची गरज आयातीतून भागवतो. त्यामुळे तेल महाग झाल्यास भारताचे आयात बिल मोठ्या प्रमाणात वाढेल आणि सामान्य नागरिकांवर त्याचा थेट भार पडेल. २००८ च्या मंदीची आठवण विल्मोट यांनी सांगितले की, होर्मुझ न उघडल्यास आणि क्रूड १५० डॉलरवर गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. तरी सध्याचा भाव अद्याप २००८ च्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा कमी आहे. त्यावेळी महागड्या तेलामुळे जागतिक मंदीचे सावट आले होते. होर्मुझ उघडणे हे सर्व पक्षांसाठी प्राधान्य असले पाहिजे. तीन-चार आठवड्यांत न उघडल्यास ते पाच ते सहा आठवड्यांत उघडण्याचे प्रयत्न सुरूच राहतील आणि ते उघडताच तेलाचे भाव पुन्हा खाली येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.