सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव; शेतकरी हतबल, औषध फवारणीला वेग

चिंबळी: खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे आणि केळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेल्या सोयाबीन पिकावर गेल्या आठ दिवसांपासून हुकणी आणि लाल किडीच्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. यामुळे पिके पिवळी पडू लागली असून, शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली आहे.
यंदा मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणीची कामे उशिरा झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी खुरपणीच्या कामात व्यस्त होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून कडक उष्णता आणि सकाळ-संध्याकाळ ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू झाल्या आहेत.





