अवैध बांधकाम कारवाईतील दिरंगाईची चौकशी : जितेंद्र आव्हाड

मुंबई – मानखुर्द-शिवाजीनगर येथील अवैध गाळे शासनातर्फे हटविताना झालेल्या दिरंगाईची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.
मानखुर्द-शिवाजीनगर येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, एकता नगर, मंडाळा, टी जंक्शन, मानखुर्द येथील अवैध गाळ्यासंदर्भात विधानसभा सदस्य अबू आजमी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, मानखुर्द-शिवाजीनगर येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, एकता नगर, मंडाळा, टी जंक्शन, मानखुर्द येथे सहा गाळे अवैध होते.
त्यापैकी चार गाळे पाडले गेले आहेत. दोन अद्यापही तिथे तसेच आहेत. या दोन गाळे बांधकामावर कारवाई न करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. उर्वरीत दोन अवैध असलेले गाळे तोडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.





