खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. 10 कोटीची ही योजना 100 कोटींवर गेली आहे. रस्ते खोदल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज असताना काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अशा प्रकारे खोदून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाईची मागणी माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी केली आहे. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी 96 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते. या कामासाठी शासनाने निधी दिला आहे. या योजनेचे पाइप टाकण्यासाठी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ठेकेदाराने खोदले आहेत. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी केली आहे.