satara | मतदान जनजागृतीसाठी झेडपीकडून अभिनव उपक्रम

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघातील मागील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने सातारा स्वीप कक्षामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या निर्देशानुसार प्रयत्न केले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य लोकांच्या दळणवळणाच्या मार्गावर “ ७ मे २०२४ – १०० % मतदान ” अशी वाक्ये लिहून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक अनोखा उपक्रम सातारा जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे.
मतदान जनजागृतीपर घोषवाक्ये ही मतदारांच्या नजरेत भरण्यासाठी व मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग,शहरी रस्ते,ग्रामीण रस्ते, रहदारीचे रस्ते तसेच गावांच्या प्रवशेव्दाराजवळ आदी ठिकाणी लिहून १०० % मतदारांपर्यंत मतदान जनजागृती करण्याचा वेगळा उपक्रम सातारा जिल्हा स्वीप कक्षामार्फत राबविण्यात आला आहे.
याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या असून त्याबाबत सर्व जिल्हयामध्ये कार्यवाही होताना दिसत आहे. या उपक्रमांमुळे मतदान मोठया प्रमाणात होईल व मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य माणसाच्या दळणवळणाचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या मार्गावर किंवा रस्त्यावर अशा प्रकारची मतदान विषयक जनजागृती ही निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोलाची ठरणार आहे.





