Pimpri : डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी संस्थांचा पुढाकार

तळेगाव दाभाडे : शहरातील विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळे व पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पाठींबा देत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाच्या शांतता कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी डीजे मुक्त मिरवणुकीचे आवाहन केले होते. या संकल्पनेला शहरातील ११ सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला असून, त्यांच्यातर्फे भेगडे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना, डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, हृदयविकार आणि कानाच्या आजारांनी त्रस्त रुग्ण, तसेच वन्यजीव यांच्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे गणेश मिरवणुका पारंपरिक वाद्ये, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाने साजऱ्या कराव्यात, असे आवाहन भेगडे यांनी केले.
मोठ्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे डीजेमुक्त सण साजरा करण्याची गरज अधिक जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव पर्यावरणपूरक व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या वेळी निवेदन सादर करताना सर्व ११ सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, संस्थापक व पदाधिकारी उपस्थित होते.





