महागाईचा फटका: तिसऱ्या तिमाहीत भारतात सोन्याच्या मागणीत १६% घट!

नवी दिल्ली – जुलै – सप्टेंबर या तिमाहीत भारतात सोन्याची मागणी महागाईमुळे वजनात 16 टक्क्यांनी कमी झाली आहे. ग्राहकांनी दागिने खरेदी टाळली तरी गुंतवणुकीसाठी सोन्याच्या मागणीवर नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने सांगितले.
जुलै- सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी 16 टक्क्यांनी कमी होऊन वजनात 209 टन झाली आहे.
मात्र मूल्यात याच कालावधीत सोन्याची मागणी 23 टक्क्यांनी वाढून 2.03 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही मागणी 1.65 लाख कोटी रुपयांची होती. भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश समजले जाते. जुलै- सप्टेंबर या तिमाहीत दागिन्यांची मागणी 31 टक्क्यांनी कमी होऊन 117 टन झाली. गेल्या वर्षी ही मागणी 171 टन होती. वजनातील मागणी कमी झाली असली तरी मूल्यातील मागणीत मात्र फारसा फरक न पडता ही मागणी 1.14 लाख कोटी रुपयांची राहिली.
दागिन्यांची मागणी कमी झाली असली तरी गुंतवणुकीसाठीच्या सोन्याची मागणी 20 टक्क्यांनी वाढून 91.6 टन झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 74 टक्के वाढ झाली आहे. मूल्यांमध्ये ही मागणी 51 हजार कोटी रुपयांवरून 88 हजार कोटी रुपयांवर गेली. जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले की, गेल्या काही तिमाहीपासून दागिन्यांची वजनात मागणी स्थिर आहे. तर गुंतवणुकीसाठीच्या सोन्याची मागणी वाढत आहे. याचा अर्थ सोन्याला गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदार अधिक महत्त्व देऊ लागले आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत सोन्याचा दर 46 टक्क्यांनी वाढला होता. या तिमाहीनंतर या दरात जास्तच वाढ झाली असल्याचे दिसून येते. आगामी काळातही दागिन्यांची मागणी मर्यादित राहील आणि गुंतवणुकीची मागणी जास्त राहील असे समजले जाते. या कालावधीत देशातील दागिने उत्पादकांनीही ग्राहकाकडून कमी वजनाचे दागिने खरेदी केले जात असल्याचे सांगितले होते.
या तिमाहीत सोन्याची आयात 37% कमी होऊन 194.6 टन झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत ही आयात 368.2 टन इतकी होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सोन्याच्या आयातीवरील शुल्क कमी केल्यामुळे सोन्याची आयात वाढली होती. यावर्षी असा काही प्रकार घडलेला नाही. या पार्श्वभूमीवर चालू वर्षामध्ये सोन्याची आयात 600 ते 700 टन इतकी होण्याची शक्यता आहे. पहिल्या नऊ महिन्यांमध्ये सोन्याची आयात 665.4 टन इतकी झाली आहे. रिझर्व बँक सोने खरेदी करीत असल्यामुळे ही सोन्याच्या आयातीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येते.





