लखनौ : मचा उद्देश 2027 च्या विधानसभा निवडणुका जिंकून पीडीएचे सरकार बनवणे आहे. सपा सरकार स्थापन करण्यासाठी बूथ स्तरापर्यंत संघटन अधिक मजबूत करावे लागेल. भाजपच्या धोरणामुळे राज्यातील जनतेला विनाशाशिवाय काहीही मिळालेले नाही. भाजप पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाला आहे. घरोघरी पाणी योजनेत लूट सुरू आहे. आरोग्य विभागात सर्वच स्तरावर भ्रष्टाचार आहे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आघाडीच्या संघटनांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत अखिलेश यादव पक्षाच्या मुख्यालयात बोलत होते. राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल सिंह यादव, विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव आणि राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी हेही या बैठकीला उपस्थित होते. अखिलेश म्हणाले की, भाजपमध्ये माफियाचा वावर आहे. येथे सत्तेत असलेले योगी प्रत्यक्षात योगी नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे. ते प्रामाणिकही नाहीत. भाजप सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. यादव म्हणाले की, शेतकरी, युवक, मजूर, व्यापारी, शिक्षक, वकिलांसह सर्व वर्ग त्रस्त आहे. डॉ.राम मनोहर लोहिया, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारसरणीचा आणि मुलायमसिंह यादव यांच्या संघर्षाचा वारसा सपाकडे आहे. सामाजिक न्यायाची लढाई फक्त समाजवादीच लढत आहेत. आजही हा संघर्ष सुरू आहे. जातीगणनेतूनच सर्वांचा सहभाग निश्चित केला जाईल, अही यादव यांनी सांगितले. भाजपला संविधान बदलायचे आहे अखिलेश म्हणाले की, लोकशाहीचा मूळ आत्मा संविधान आहे. भाजपला राज्यघटनाच बदलायची आहे. आरक्षण आणि मतदानाचा अधिकार संपवायचा आहे. लोकशाही संस्थाही कमकुवत होत आहेत. भाजप निवडणुकीत अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र जबरदस्तीने हिसकावून घेते आणि फाडते. अशा स्थितीत सरकारकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा कशी करता येऊ शकेल?