INDW vs ENGW : लॉर्ड्सवर तिरंगा फडकला! भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (INDW vs ENGW) नवा इतिहास रचला आहे.

INDW vs ENGW : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (INDW vs ENGW) नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान खेळवल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा २७० धावांनी धुव्वा उडवला.
लॉर्ड्सच्या मैदानावर (INDW vs ENGW) पहिल्यांदाच महिलांची कसोटी लढत आयोजित करण्यात आली होती आणि या पहिल्याच ऐतिहासिक सामन्यात भारतीय रणरागिणींनी विजय मिळवून हा सामना कायमचा संस्मरणीय बनवला. सामन्याच्या पहिल्या डावापासूनच भारताने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती, जी अखेरपर्यंत कायम राखली.
स्मृती-हरमनप्रीतची फटकेबाजी आणि क्रांतीचा ‘पंच’
या ऐतिहासिक सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून पहिल्या डावात सलामीवीर स्मृती मंधानाने उत्कृष्ट फलंदाजी करत १०८ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौर (१२१ चेंडूत ५८ धावा) आणि दीप्ती शर्मा (८७ चेंडूत ५७ धावा) यांनी अर्धशतकी खेळी करत मोलाची साथ दिली. या तिघींच्या जबाबदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २८७ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. भारताची गोलंदाज क्रांती गौड हिने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिने १७ षटकांत ७ मेडन (निर्धाव) षटके टाकत अवघ्या ३७ धावांच्या मोबदल्यात इंग्लंडचा निम्मा संघ (५ गडी) तंबूत धाडला. तिला सायली सातघरे (२ विकेट), स्नेह राणा (२ विकेट) आणि दीप्ती शर्मा (१ विकेट) यांनी चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १७० धावांवर आटोपला आणि भारताला ११५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
दुसरा डाव: यास्तिका भाटियाचे ऐतिहासिक शतक
दुसऱ्या डावात ११५ धावांच्या आघाडीसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा दमदार (INDW vs ENGW) झाली. सलामीवीर स्मृती मंधानाने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवत १३० चेंडूत ७० धावांची खेळी केली. या डावाचे मुख्य आकर्षण ठरली ती यस्तिका भाटिया!
यास्तिकाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक शतक ठोकण्याचा पराक्रम केला. तिने १५८ चेंडूत ११३ धावांची डोळ्यांचे पारणे फेडणारी खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीत ऋचा घोषने अवघ्या ५२ चेंडूत नाबाद ५० धावा कुटल्या. भारताने आपला दुसरा डाव ७ बाद ३४१ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी ४५६ धावांचे डोंगराएवढे विशाल आव्हान ठेवले.
इंग्लंडचा डाव गडगडला; भारताचा ऐतिहासिक विजय
४५६ धावांच्या या विशाल लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या महिला संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. स्नेह राणा, सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा या चौकडीने दुसऱ्या डावातही आपल्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजीची कमाल दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १८६ धावांवर गारद झाला.
या मोठ्या विजयासह भारतीय महिला संघाने (INDW vs ENGW) लॉर्ड्सच्या मैदानावर २७० धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला असून, हा विजय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.






