#INDvWI Test Series 2023 : पुजाराला वगळणे अनाकलनिय – हरभजन

नवी दिल्ली :- मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आल्याचे समजल्यावर धक्का बसला. जो संघातील सर्वात चांगला कसोटी फलंदाज मानला जातो, त्यालाच वगळले गेले हे अनाकलनिय आहे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे.
एखाद्या सामन्यातील अपयश खेळाडूची गुणवत्ता तपासू शकत नाही. पुजारा हाच सध्याच्या भारतीय संघातील परिपूर्ण कसोटी फलंदाज आहे आणि त्यालाच वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळू नये याचे आश्चर्य वाटते.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन्ही डावात त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत म्हणून जर त्याला वगळले गेले असेल तर मग कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहलीने तरी किती धावा केल्या ते देखील पाहायला हवे होते. केवळ संघात नवोदितांना संधी देण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना असे अपमानास्पदरीत्या संघातून वगळले योग्य नाही, असेही हरभजनने म्हटले आहे.
भारतीय कसोटी तसेच एकदिवसीय संघ पाहिला तर असेच विचारावेसे वाटते की संघ निवडीचा निकष नक्की काय आहे. केवळ आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा केल्या म्हणून जर थेट भारतीय संघात स्थान मिळत असेल तर मग संघ निवडीचे पारंपरिक निकष असलेल्या देशांतर्गत स्पर्धांना काहीही अर्थ उरणार नाही. बीसीसीआयने एकदा जाहीररीत्या संघ निवडीचे निकष सांगावेत, असा टोलाही हरभजनने लगावला आहे.




