#INDvWI 3rd ODI : भारताचा विंडीजवर 200 धावांनी विजय; मालिकाही 2-1 ने घातली खिशात

त्रिनिदाद :- शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार व कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान वेस्ट इंडिजचा तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात तब्बल 200 धावांनी मात केली. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकत वेस्ट इंडिज विरुद्धचे 2006 सालापासूनचे यश कायम राखले.
त्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या, इशान किशन, शुभमन गिल, संजू सॅमसन यांची अर्धशतके व सूर्यकुमार यादवची उपयुक्त खेळी यामुळे भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 151 धावांवर संपुष्टात आला.
त्यांच्याकडून गुडाकेश मोतियेने 39, एलिस अथांजेने 32, अल्झारी जोसेफने 29 तर, यान्नीक किरीहाने 19 धावांची खेळी केली व त्यामुळे संघाला दीडशतकी मजल तरी मारता आली. भरात असलेला त्यांचा कर्णधार शाई होपसह सर्व प्रमुख फलंदाज साफ अपयशी ठरल्याने त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्धची मालिका गमवावी लागली. त्यांना भारताविरुद्ध 2006 सालापासून अद्याप एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. भारतीय संघाच्या शार्दुल ठाकूरने 4, मुकेश कुमारने 3 तर कुलदीप यादवने 2 गडी बाद केले.
जयदेवचे दहा वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन…
जयदेव उनाडकट या भारताच्या वेगवान गोलंदाजाने तब्बल 10 वर्षांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन केले. त्याला जरी एकच बळी मिळवता आला असला तरीही त्याने त्याच्या 5 षटकांत अवघ्या 16 धावा देत भेदकता सिद्ध केली.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 50 षटकांत 5 बाद 351 धावा. (शुभमन गिल 85, इशान किशन 77, संजू सॅमसन 51, सूर्यकुमार यादव 35, हार्दिक पंड्या नाबाद 70, रवींद्र जडेजा नाबाद 8, रोमारीओ शेफर्ड 2-73).
वेस्ट इंडिज – 35.3 षटकांत सर्वबाद 151 धावा. (गुडाकेश मोतिये 39, एलिस अथांजे 32, अल्झारी जोसेफ 29, यान्नीक किरीहा 19, शार्दुल ठाकूर 4-37, मुकेश कुमार 3-30, कुलदीप यादव 2-25, जयदेव उनाडकट 1-16).





