#INDvWI 2nd Test : भारताचेच पारडे राहणार जड; आजपासून वेस्ट इंडीजविरुद्ध दुसरा कसोटी सामना

त्रिनिदाद : – भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर आजपासून (वेळ : 07.30PM) प्रारंभ होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना डावाने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसराही सामना जिंकत यजमान संघाला व्हाइटवॉश देण्यासाठीच भारतीय संघ मैदानात उतरेल.
भारताच्या फलंदाजीत काही प्रमाणात बदल करण्याचे संकेत मिळत असले तरीही विजयी संघच कायम राखण्याकडे कर्णधार रोहित शर्माचा कल राहील, असे वाटते. त्यातच पहिल्या कसोटीत पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने दीडशतकी खेळी केल्यामुळे सलामीत कोणतेही बदल केले जाणार नाहीत हे तर उघड आहे. मधल्या फळीत विराट कोहलीचे स्थान निश्चित असले तरीही अजिंक्य रहाणेच्या जागी ऋतुराज गायकवाडला खेळवण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. तसेच यष्टीरक्षक श्रीकर भरतला ईशान किशनच्या जागी पसंती मिळू शकते.
फिरकी गोलंदाजीतही रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या जागी अक्सर पटेलच्या समावेशाची शक्यता खूपच कमी आहे. वेगवान मारा महंमद सिराजवरच अवलंबून राहणार असला तरीही जयदेव उनाडकटला वगळून नवोदित मुकेश कुमारला संधी मिळणार का, याकडे लक्ष राहील. सध्या तरी कमकुवत वेस्ट इंडीजपेक्षा याही कसोटीत भारतीय संघाचेच पारडे जड राहणार आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडीजबाबत बोलायचे तर त्यांना अद्याप संघ बांधणीच्याच प्रक्रियेतून जावे लागत असल्याने अंतिम संघ कोणताही निवडला तरीही भारताचा मुकाबला करण्याचा दर्जा त्यांच्या संघात सध्यातरी दिसत नाही. काही चमत्कारच त्यांना तारेल. त्यांचा कर्णधार क्रेग बर्थव्हाइट, जेरेमी ब्लॅकवूड, नवोदित एलिस अथांज, तेगनरेन चंदरपॉल हे चांगले खेळाडू आहेत, पण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आह.
गोलंदाजीतही रहिकीम कॉर्नवॉल वगळता त्यांच्या एकाही गोलंदाजाला चमक दाखवता आलेली नाही. जोसन होल्डर, केमार रोश आणि या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलेल्या कविन सिंक्लेअरकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
रहाणेला खेळावेच लागेल…
भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केल्यावर लगेचच उपकर्णधारपदही परत मिळाले असले तरीही अजिंक्य रहाणेचे संघातील स्थान निश्चित असल्याचे खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. त्याला संघातील स्थान कायम राखायचे असले तर त्याला मोठी खेळी करावीच लागेल, अन्यथा जे चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत घडले तेच रहाणेच्याही बाबतीत घडेल. संघाच्या सराव सत्रात त्याने कसून सराव केला असला तरीही त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत प्रत्यक्ष सामन्यात झाले तरच संघाला त्याचा लाभ होणार आहे.




