#INDvWI 2nd Test Day 1 : विराट-रोहितची दमदार अर्धशतके, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 288 धावा…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार गडी गमावून 288 धावा केल्या होत्या.
विराट कोहली नाबाद 87(161) तर रवींद्र जडेजा नाबाद 36(84) धावांवर खेळत आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत 201 चेंडूत 106 धावांची भागीदारी झाली आहे. रोहित शर्मा(80) आणि यशस्वी जयस्वाल(57) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे 8 आणि शुभमन गिल 10 धावा काढून बाद झाले.
विराटसाठी हा सामना खास…
विराटचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा टप्पा गाठणारा तो भारताचा चौथा आणि एकूण 10 वा क्रिकेटपटू आहे.
सचिन तेंडुलकरने (664), महेला जयवर्धने (652), कुमार संगकारा (594), सनथ जयसूर्या (586), रिकी पाँटिंग (560), महेंद्रसिंग धोनी (538), शाहिद आफ्रिदी (524), जॅक कॅलिस (519) आणि राहुल द्रविडने 509 सामने खेळले आहेत.





