#INDvNZ 1st T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पहिला टी-20 सामना, रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

जयपूर -आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडलेल्या व सुमार कामगिरी केलेल्या भारतीय संघाला आता आजपासून मायदेशात सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या विश्रांतीनंतर हिटमॅन रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचा कस लागणार असून संघात संधी मिळत असलेल्या नवोदित खेळाडूंना आपल्या गुणवत्तेची साक्षही द्यावी लागणार आहे.
या मालिकेसाठी विराट कोहलीसह अन्य काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यामुळे रोहितकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व केले असल्याने मायदेशात होत असलेली ही मालिका भारतीय संघच जिंकेल असे म्हटले जात असले तरीही क्रिकेटच्या या प्रकारात न्यूझीलंडने भारतावर सातत्याने वर्चस्व राखले आहे.
या मालिकेसाठी आयपीएलमध्ये अफलातून कामगिरी केलेल्या व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान यांना गोलंदाजीत तर ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांना फलंदाजीत आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. न्यूझीलंडकडे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, इश सोधी व मिचेल सॅंटनर यांच्यावर भारतीय फलंदाजीला रोखण्याची मदार राहणार आहे. मायदेशात भारतीय संघाची कामगिरी अव्वल ठरली असल्यामुळे न्यूझीलंडला मालिका विजयासाठी भारतावर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिनही क्षेत्रात जास्त सरस कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजीत त्यांची संपूर्ण मदार सलामीवीर मार्टीन गुप्टील याच्यावरच राहणार आहे. डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय वातावरणात तसेच येथील खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली तर भारताला ही मालिका जिंकणे कठीण होऊ शकते. तर दुसरीकडे त्यांच्या गोलंदाजीवर भारतीय संघातील फलंदाज कशी कामगिरी करतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे. सलामीला कर्णधार रोहितसह लोकेश राहुल फलंदाजी करणार असल्याने या मालिकेतील तिनही सामन्यांत भारताला अव्वल सलामी मिळणे महत्वाचे ठरेल.
भारतीय संघाने यंदा नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सुमार कामगिरी केली होती. भारतीय संघाला सुपर 12 फेरीतून उपांत्य फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच न्यूझीलंडलाही अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांनाही ही मालिका प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जिंकवी लागणार आहे. सध्या दोन्ही संघांचे बलाबल पाहता समतोल संघातच ही लढत होणार असली तरीही मायदेशातच सामने खेळायचे असल्याने भारतीय संघाचे पारडे काहीसे जड राहणार आहे.
विल्यमसनची माघार, साउदी कर्णधार
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनने भारताविरुद्धच्या या टी- 20 मालिकेतून माघार घेतली असून त्याच्या जागी टीम साउदी याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत 85 धावांची वादळी फलंदाजी केलेल्या विल्मसनने केवळ कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या मालिकेतून माघार घेतली असून कसोटी संघाचे सराव शिबिर सुरु झाले असून त्यात विल्यमसनने सहभागही घेतला आहे.
प्रदूषणाचे सावट
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचे लोण अन्यत्र पाहोचले असून जयपूरमधील प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील हवामान दूषित झाले असून त्याचा खेळाडूंच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील गेल्या दोन आठवडयांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, बीसीसीआयने हा सामना होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.





