Bhor : भोरमध्ये इंद्रायणी तांदळाचे ब्रॅडिंग होणार
Bhor : या गाळ्यांची उभारणी झाल्यानंतर होलसेल बांबू मार्केट, कोल्ड स्टोरेज व सहकार तत्वावर सोयाबीन ऑइल मिलची उभारणी केली जाणार असल्याचे भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

भोर : भोर तालुक्याला इंद्रायणी तांदळाचे कोठार समजले जात असून या सुवासिक व चवदार तांदळाचे ब्रॅण्डिंग व्हावे या हेतूने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये २७ गाळे उभारले जाणार आहेत. यामुळे ग्राहकाला बिन भेसळयुक्त, चवदार व सुवासिक इंद्रायणी भाताचा आस्वाद घेता येणार असून शेतकऱ्यालाही चांगला भाव मिळणार आहे. या गाळ्यांची उभारणी झाल्यानंतर होलसेल बांबू मार्केट, कोल्ड स्टोरेज व सहकार तत्वावर सोयाबीन ऑइल मिलची उभारणी केली जाणार असल्याचे भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भोरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २७ गाळे उभारले जाणार असून याचे भूमिपूजन भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. यादरम्यान आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भोर नगरपरिषदेचे नगरसेवक, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक, खरेदी विक्री संघ संचालक, दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्थेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
थोपटे म्हणाले की, भोर तालुक्यात भात पीक मुख्य पीक असून यानंतर सोयाबीन या पिकाचेही भरपूर उत्पन्न घेतले जात आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळावा या हेतूने कृषी उत्पन्न समितीच्या आवारामध्ये सोयाबीन ऑइल मिलची उभारणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांवर पीक साठवण्याची वेळ आल्यास यासाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी केली जाणार असून कृषी उत्पन्न समितीच्या उर्वरित जागेमध्ये बांबूचे होलसेल मार्केट उभारले जाणार आहे.





