पिंपरी, (प्रतिनिधी) – काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढीवारीच्या नियोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बुधवारी (दि.29) आळंदीत पाहणी दौरा केला. या पाहणी दौर्यादरम्यान त्यांनी यंदाची वारी ही ‘सुरक्षित वारी,हरित वारी’ या संकल्पनेवर आधारीत असावी, अशा सूचना केल्या; मात्र त्यांच्या पाहणी दौर्यादरम्यान काही अंतरावर फेसाळलेल्या इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. आषाढी वारीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत आळंदी येथील दर्शनबारी जागा, भक्तीसोपान पूल, स्कायवॉक, नदी पात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणा योग्य ते दिशानिर्देश दिल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. मात्र अगदी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या इंद्रायणी नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. श्रीक्षेत्र आळंदीत वर्षभरात भरणार्या आषाढी व कार्तिकीवारीला हजेरी लावणार्या लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे, कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवणे, भाविकांना यात्राकाळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या दोन्ही वार्यांच्या काही दिवस आगोदर विविध शासकीय विभागांची बैठक घेतली जाते. त्यानुसार नियोजन केले जाते. जिल्हाधिकारी स्वत: या बैठकीला उपस्थित असतात. दरम्यान, या बैठका केवळ कागदी घोडे नाचविण्यासाठी घेतल्या जातात का? असा प्रश्न पडावा इतपत इंद्रायणी नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन्ही डॉक्टर जिल्हाधिकार्यांना प्रदूषणाची नस सापडेना आळंदीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या कार्तिकीवारीचे बैठकीत नदीपात्रात भाविकांच्या स्नानासाठी पाणी सोडण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. मात्र त्याचवेळी इंद्रायणीत फेसाळणार्या नदी प्रदूषणाबाबत चकार शब्ददेखील या बैठकीत काढला गेला नाही. तर आषाढीवारी नियोजनासाठी पाहणीदौरा केलेले जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनीदेखील या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. केंद्रस्थानी असलेला भाविकांच्या आरोग्याशी खेळ आळंदीत येणारा प्रत्येक वारकरी हा इंद्रायणीचे तीर्थ प्राशन करतो; मात्र आज नदीपात्रातील पाण्याला काळा रंग आला असून कमालीची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आषाढीवारीत सहभागी होणार्या भाविकांना यंदा तीर्थप्राशन करणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे एवढ्या राबणार्या यंत्रणेकडून केंद्रस्थानी असलेला भाविकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे चित्र आहे.