Indrayani Kundmala bridge : ‘मी तिघांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला’; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशचा थरारक अनुभव

पुणे : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 2 ते 3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे, परंतु मावळमधील मुसळधार पाऊस आणि नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे बचावकार्य कठीण झाले आहे. या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले योगेश भंडारे यांनी आपला थरारक अनुभव शेअर केला आहे. Indrayani Kundmala bridge collapse |
योगेश भंडारेने सांगितला दुर्घटनेचा थरार
खराडी (पुणे) येथे राहणारे आणि बँकेत नोकरी करणारे योगेश भंडारे आणि त्यांची पत्नी शिल्पा भंडारे रविवारी कुंडमळा येथे पावसाळ्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. पूल कोसळला तेव्हा ते दोघेही पुलाच्या मध्यभागी होते. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, योगेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी मृत्यूला डोळ्यांदेखत पाहिलं. पूल कोसळला तेव्हा मी आणि शिल्पा मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला. लोक ओरडत होते, ‘घाई करू नका, जाऊ नका,’ पण कोणी ऐकलं नाही. अचानक पूल खचला आणि सगळे नदीच्या पाण्यात पडलो. मी आणि शिल्पा कसेबसे किनाऱ्यापर्यंत पोहचलो, पण अनेकजण प्रवाहात वाहून गेले.”
योगेश यांनी सांगितले की, पूलावर 100 हून अधिक पर्यटक होते, आणि अनेकजण सेल्फी काढण्यात आणि फोटो घेण्यात व्यस्त होते. “पुलावर खूप गर्दी होती. काहींनी गाड्या चढवल्या होत्या. अचानक एक मोठा आवाज झाला आणि पूल कोसळला,” असे त्यांनी नमूद केले.
रविवार असल्याने आणि पावसाळ्यामुळे इंद्रायणी नदीच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. हा पूल 30 वर्षांपेक्षा जास्त जुना असून, तो आधीच जीर्ण झाला होता. पर्यटक आणि दुचाकींच्या ओझ्यामुळे तो कोसळला, अशी प्राथमिक माहिती आहे.
तातडीने बचावकार्य सुरू
NDRF, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 51 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पवना रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात 10 जणांवर उपचार झाले, त्यापैकी दोघे आयसीयूमध्ये होते, तर इतरांना किरकोळ जखमांमुळे घरी सोडण्यात आले. अथर्व रुग्णालयात 17 जखमींवर उपचार झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
बेपत्ता लोकांचा शोध
प्रशासनाकडे बेपत्ता लोकांच्या नेमक्या संख्येबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, 2 ते 3 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री पुलाचा लोखंडी सांगाडा नदीपात्रातून काढण्यात आला, तरीही बेपत्ता लोकांचा शोध घेणे बाकी आहे. NDRF चे पथक सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीत उतरणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा वेग वाढल्याने बचावकार्य कठीण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुखः व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “आम्ही जोपर्यंत शेवटचा मृतदह सापडत नाही, तोपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवू.”
पावसाचे आव्हान
मावळ तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र झाला आहे. कुंडमळा परिसरातील नदीपात्रात पाण्याचा वेग जोरदार असल्याने NDRF समोर बचावकार्य करताना मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. तरीही, NDRF, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवक युद्धस्तरावर शोधकार्य करत आहेत.





