पिंपरी | जलपर्णीने इंद्रायणी गुदमरतेय

देहूगाव, ( वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीपात्र जलपर्णीने वेढले असून इंद्राणी नदी गुदमरत आहे. नदीपात्राला उद्यानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जलपर्णीने नदीपात्रातील पाणी प्रदूषित झाले असून नदी परिसरामध्ये दुर्गंध पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या बीज सोहळ्यामध्ये राज्यभरातून सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक वारकरी सहभागी होतात. सोहळ्यात येणारे भाविक इंद्रायणी नदी पात्रामध्ये स्नान करीत तीर्थ म्हणून नदीचे पाणी प्राषान करतात. या इंद्रायणी नदीचा संपूर्ण पात्र जलपर्णीने वेढलेले आहे .रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे दुषित, सांडपाणी, ओढ्या नाल्यातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदीचा नैसर्गिक समतोल ढासळला असून जलपर्णीचा विस्तारासाठी पोषक बनत आहे.
जलपर्णी पाण्याचा प्रवाह तर अडवतेच पण पाण्यावरील जलपर्णीच्या थरामुळे सूर्याची किरणे आणि ऑक्सिजन पाण्यात तळापर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीत झाले आहे. नदी, पानवठ्याजवळ राहणाऱ्या पक्षांना आवश्यक असलेले कीटक आणि जलजरांचे प्रमाणही घटल्याने जलचर प्राणी व जलजीवांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जलचरांचे जीव धोक्यात आले आहे. प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
जलपर्णीने वेढलेल्या व दुर्गंधी पाण्यामुळे परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव ही वाढला आहे. नदी घाटावर सकाळी आणि सायंकाळी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना तसेच दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच इंद्रायणी नदी पात्रातील पाणी पिण्यासाठी जलकेंद्राजवळ उपसा केला जात असून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे त्वरित जलपर्णी काढून नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी परिसरातून नागरिक करीत आहे.
देवमाशांचा मृत्यू
देवमासा अर्थात महाशीर ( खवली मासे) माशांचा उल्लेख गाथेमध्ये आढळून येत असून देहू वगळता इतरत्र आढळून येत नसल्याचे सांगण्यात येते. नदीपात्रात वाढत्या जलपर्णीने व दूषित झालेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला असून नदी पात्रांमध्ये असणारे देवमास्यांचा मृत्यू होत आहे.
दशक्रियेचे निर्मल्य, साहित्य नदीपात्रात
नदीपात्रामध्ये मृत व्यक्तींचे कपडे किंवा अनावश्यक असलेले कपडे, गोधड्या टाकल्या जातात. नदी घाटावर कपडे धुतले जातात. दशक्रिया विधीनंतर निर्माल्य, मडकी पूजेनंतर उर्वरित साहित्य नदीपात्रामध्ये टाकले जाते. कंपन्यांचे रसायनयुक्त दूषित व मैला मिश्रीत सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. धुतलेल्या कपड्यांमुळे फेसाळणारी साबणाचे, रसायनमिश्रीत पाणी, वाढती जलपर्णी तसेच बेकायदेशीर वाळू उपसा आदींमुळे नदी प्रदूषित होत आहे.
कारवाईची मागणी
देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील वाढत्या गृहप्रकल्पे व सोसायटयांचे सांडपाणी ओढया – नाल्यातून थेट इंद्रायणीत तसेच हद्दीतील सांडपाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हे दूषित पाणी जलपर्णी वाढण्यास पोषक आहे. या दूषित पाण्यामुळे नदी पात्रातील माशांचा मृत्यू होत असल्याने नगरपंचायतीवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
– नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी सप्ताह राबवणे.
-स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या क्षेत्रातील नदी पात्रात रोप ( दोर) लावून जलपर्णी अडवून प्रतिदिन काढणे.
– नदी पात्रालगत कपडे धुणारे अथवा निर्माल्य व इतर साहित्य टाकणाऱ्यां नागरिकांसह रासायनिक द्रव्य असले रसायन युक्त दूषित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई करणे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सेवाभावी संस्थांची नोंद ठेवणे.





