यंदा प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार ‘या’ देशाचे राष्ट्रपती; पण पाकिस्तानमुळे निर्माण झाला पेच

Republic Day Chief Guest: देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी उत्साहात सुरू आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामागचे कारण हे पाकिस्तान आहे.
रिपोर्टनुसार, सुबियांतो हे भारतानंतर पाकिस्तानला देखील भेट देणार होते. मात्र, भारताने याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांटो यांनी पाकिस्तानचा दौरा पुढे ढकलला असल्याचे सांगितले जाते.
विविध मुद्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये राजनैतिक संवाद सध्या बंद आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यानंतर थेट पाकिस्तानला गेल्यास यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. भारताने याबाबतचा मुद्दा मांडल्यानंतर आता सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पाकिस्तानचा दौरा टाळू शकतात. यापूर्वी देखील इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती जोको विडोडो हे वर्ष 2018 मध्ये भारत भेटीनंतर थेट पाकिस्तानला गेले होते. जोको विडोडो यांनी भारतानंतर पाकिस्तानला भेट दिल्यानंतर याची प्रचंड चर्चा झाली होती.
दरम्यान, भारताकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जगभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले जाते. गेल्यावर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तर 2023 मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल-सिसी उपस्थित होते.





