Pune Airport – दिल्ली येथून आलेल्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची चिठ्ठी विमानात सापडली होती, त्यानंतर विमानतळावर गोंधळ उडाला. सीआयएसएफकडून विमानाची तपासणी करण्यात आल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, या अफवेमुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) कडक करण्यात आली आहे. बंदोबस्त वाढविण्यात आला असून क्विक रिऍक्शन टीम (क्यूआरटी) कार्यान्वित केली आहे.विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ३० जानेवारी २०२६ पर्यंत सर्व उड्डाणांसाठी १०० टक्के सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग (एसएलपीसी) सक्तीचे करण्यात आले आहे. उड्डाणापूर्वी आणि आगमनानंतर अतिरिक्त तपासणी केली जाणार आहे. विमानतळ परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. विमानतळाकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची व प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही व इतर देखरेख यंत्रणांची कार्यक्षमता वाढविण्यात आली आहे. कार्गो टर्मिनलवरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे. ग्राउंड हँडलिंग कर्मचारी आणि इतर विमानतळ कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर असणार आहे. प्रवेश नियंत्रण अधिक कडक केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांची विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवासी, विमाने आणि विमानतळाची पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी अधिक सतर्क राहून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.