Indian Weapons Exhibition – स्नायपर एमके १, एयर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके ४७ रायफल, एमएमजी गन, टियर गॅस गन यांसह ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब अशा देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणाऱ्या अभेद्य शस्त्रांना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा यांसह विविध प्रकारची युद्धसज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्सदेखील ठेवण्यात आली आहेतश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या शस्त्रांचे प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार आणि ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, ॲम्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्रीदत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अ जय मोझर, रुणाल केसरकर, अंकुश रासने यांसह लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, भारत सरकार रक्षा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ॲम्युनिशन्स इंडिया लिमिटेडने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशांत निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. हे प्रदर्शन सोमवारी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून पुणेकरांनी प्रत्येक शस्त्राविषयी माहितीदेखील तत्काळ घेता येत आहे. ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांकरिता लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टीम, बुलेटस्, हँड ग्रेनेड, अँटी सम्बरिन रॉकेट, एरियल बॉम्ब यांसह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळत आहे.