Indonesia : इंडोनेशियात मोठी दुर्घटना ! प्रवासी बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू

मानादो (इंडोनेशिया) : इंडोनेशियामध्ये एका प्रवासी बोटीला अचानक लागलेल्या भीषण आगीमध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाजवळ ही दुर्घटना घडली. बोटीवर असलेल्या २८ पेक्षा जास्च प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली असून हे मदत कार्य अजूनही सुरू असल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक प्रवाशांनी आगीपासून वाचण्यासाठी समुद्रामध्ये उड्या मारल्या होत्या, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
के.एम. बार्सिलोना असे या प्रवासी बोटीचे नाव असून ही बोट नॉर्थ सुलावेसी प्रांतातील तालाउद येथून या प्रांताची राजधानी असलेल्या मानादो शहराकडे निघाली होती. थालिसे भागामध्ये पोचल्यानंतर या बोटीला अचानक आग लागली, असे इंडोनेशियन फ्लीट कमांडचे कमांडर व्हाइस अॅडमिरल डेनिह हेंद्राटा म्हणाले.
या बोटीवरील प्रवाशांच्या मदतीसाठी इंडोनेशियाच्या नौदलातील तीन जहाजांना पाठवण्यात आले असून २८४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे वाचवण्यात आले आहे. स्थानिक मच्छिमारांनी या मदतकार्यात महत्वाचे योगदान दिले. बोटीतून उड्या मारलेल्या अनेकांना मच्छिमारांनी सुखरुपपणे किनाऱ्यापर्यंत पोचवले, असेही हेंद्राटा यांनी सांगितले.
या मदतकार्यादरम्यान ५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. प्रवाशांपैकी कोणी जखमी झाल्याचे त्वरित समजू शकलेले नाही. तसेच बोटीवर नक्की किती प्रवासी होते हे देखील समजू शकलेले नाही. भोटीला आग लागण्यामागील कारणाचा शोध घेतला जातो आहे. इंडोनेशिया हा १७,००० हून अधिक बेटांचा एक द्वीपसमूह आहे. तिथे सागरी प्रवास नियमितपणे केला जातो. प्रवासी बोटीचे अपघात तिथे नियमितपणे घडत असतात. त्यामध्ये कमकुवत सुरक्षा अंमलबजावणीला अनेकदा जबाबदार धरले जाते.





