Indonesia : फुटबॉल सामन्यानंतर हिंसाचार, चेंगराचेंगरीत एकूण 174 जण ठार

मलंग (इंडोनेशिया) – इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्याच्यावेळी झालेल्या हिंसाचारात आणि त्यानंतर उडालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 174 जण मरण पावल्याचे वृत्त आहे. (Indonesia: At least 174 dead in football stadium crush) या घटनेत 180 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अलीकडच्या काळातील फुटबॉल सामन्याच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही एक सर्वात भीषण घटना ठरली आहे. पूर्व जावाच्या मलंग शहरातील यजमान अरेमा एफसीने सुराबायाच्या पर्सेबायाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागल्याने शनिवारी संध्याकाळी सामना संपल्यानंतर ही दंगल उसळली.
आपल्या संघाच्या पराभवानंतर निराश झालेल्या, अरेमाच्या हजारो समर्थकांनी खेळाडू आणि सॉकर अधिकाऱ्यांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकून आपला संताप व्यक्त केला. कांजूरुहान स्टेडियमच्या मैदानात घुसून चाहत्यांनी गोंधळ घातला. त्यातून दंगेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आपल्यावर गोळीबार केला जात असल्याची भावना दर्शकांमध्ये निर्माण झाल्याने हजारो दर्शकांनी एकाचवेळी स्टेडियम मधून बाहेर पडण्यासाठी धावपळ केली त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
जागतिक फुटबॉल संघटनेने फुटबॉलच्या स्टेडियमवर अश्रुधुराचा वापर करण्यास बंदी घातली आहे. परंतु तरीही पोलिसांनी हा मारा केल्याने स्थिती हाताबाहेर गेली असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या गोंधळामुळे स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत फुटबॉल संघटनेचे दोन अधिकारीही मरण पावल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा भरणा अधिक आहे. एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचाही या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
रविवारी पहाटे एका पत्रकार परिषदेत पूर्व जावा पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी सांगितले की, दर्शकांनी पोलिसांवर हल्ले करण्यास आणि वाहने जाळण्यास सुरुवात केली म्हणून आम्ही अश्रुधुराचा वापर केला. अन्यथा आम्हाला त्याची गरज नव्हती.
300 हून अधिक जखमी लोकांना जवळच्या इस्पितळात नेण्यात आले परंतु अनेकांचा वाटेत आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण सुमारे 180 जखमींपैकी बऱ्याच जणांची प्रकृती खालावली आहे. या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाच्या सॉकर असोसिएशनने उर्वरित हंगामासाठी सॉकर सामने आयोजित करण्यावर अरेमाला बंदी घातली आहे.
स्टेडीयमची आसन क्षमता 42 हजार इतकी होती व सगळी तिकिटे विकली गेली होती असे सांगण्यात आले. दुर्घटना घडली तेव्हा किमान 3 हजार लोक मैदानात उतरले होते असेही सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेचे विविध व्हीडीओ व्हायरल झाले असून त्यात प्रचंड गोंधळ आणि शिवीगाळ सुरू असल्याचेही दिसून येते आहे.




