‘या’ भारतीय एअरलाइनची भरारी! ठरली जगातील सर्वात मौल्यवान विमान कंपनी

IndiGo airline | विमान सेवा पुरवणाऱ्या इंडिगो (IndiGo) या कंपनीने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 23.4 अब्ज डॉलर बाजार भांडवलासह इंडिगोने जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान विमान कंपनीचा मान पटकावला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी चौथ्या स्थानावर असलेली ही कंपनी, आता अमेरिकेच्या डेल्टा एअरलाइन्सला (Delta Airlines) मागे टाकत शिखरावर पोहोचली आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये नीचांकी पातळीवर असलेल्या इंडिगोच्या शेअर्समध्ये 35% वाढ झाल्याने कंपनीने डेल्टाला मागे टाकले. याउलट, डेल्टाच्या शेअर्समध्ये याच कालावधीत जवळपास 50% घसरण झाली आहे.
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, इंडिगो 23.4 अब्ज डॉलर्सच्या बाजारमूल्यासह पहिल्या क्रमांकावर असून, डेल्टा 23.2 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. रायनियर होल्डिंग्स (Ryanair Holdings) 21.3 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे, 2025 मध्ये आतापर्यंत टॉप 10 विमान कंपन्यांपैकी इंडिगो ही एकमेव कंपनी आहे, जिच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून इंडिगोच्या शेअर्समध्ये 14% वाढ पाहायला मिळाली. सध्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5194.90 रुपये आहे.
विमानांच्या ताफ्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर
विमानांची संख्या पाहता इंडिगो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. . फेब्रुवारी 2025 अखेरीस इंडिगोकडे एकूण 439 विमाने असून, त्यातील 355 विमानांचा वापर केला जात आहे. तर युनायटेड एअरलाइन्स 965 कार्यरत विमानांसह पहिल्या स्थानावर आहे, डेल्टा एअरलाइन्सकडे 928 विमाने आहेत, तर चायना ईस्टर्नकडे 640 विमाने आहेत.





