मुंबई, – मुंबईकरांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मोठे गिफ्ट मिळाले आहे. चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए च्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
नवी मेट्रो लवकरच रुळांवरुन मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए या लाईन येत्या मे पर्यंत जनतेसाठी सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 576 कोचेस टप्प्याटप्प्याने बंगळुरुहून मुंबईत दाखल होणार आहेत. यापैकी पहिले चार कोच मुंबईत दाखल झाले. याचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
2014 साली घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबई शहरांतील पहिली मेट्रो धावली. सात वर्षानंतर दहिसर ते डी. एन. नगर (दोन अ) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर (सात) या मार्गावरील प्रवासी सेवा कार्यान्वित होत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम “बीईएमएल’कडे सोपविण्यात आले असून स्वदेशी बनावटीची ही पहिलीच मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे.