नेवासा : बालविवाह प्रकरणात शासनाची उदासीनता; न्यायासाठी करावा लागला 3 महिने संघर्ष

नेवासा – राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत. असे असतानाच सक्षम यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला न्याय मिळवण्यासाठी तीन महिने संघर्ष करावा लागला. त्यानंतर संपूर्ण वऱ्हाडच तुरुंगात पाठवून देण्यात आले.
गंगापूर पोलीस ठाण्यात (जि.छञपती संभाजीनगर) सोमवार (दि.१७) रोजी १५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या बालविवाहास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या वधू – वरांच्या आई-वडीलांसह उपस्थित पाहुण्यांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९,१०,११ नुसार भेंडाळा गांवचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल समाधान चराटे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे-ठुबे यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये या बालविवाहाची माहिती मिळालेली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हा बालविवाह रोखण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि ११२ क्रमांकावर संपर्क साधला होता.
मुलीच्या मामाच्या घरी भेंडाळा, (जि.औरंगाबाद) येथे हा विवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला मिळाली होती. परंतु अचूक ठिकाण माहीत नसल्यामुळे हे लग्न थांबवणे प्रयत्न करुनही शक्य झालेले नव्हते. त्यामुळे हा विवाह पार पडल्यानंतर नागरिकांनी महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री ठुबे यांना लग्नातील काही छायाचित्र पाठवले त्यामुळे चौकशीत हे स्पष्ट झाले की, मुलीला पैठण तालुक्यातील एका गावी हलविण्यात आले आहे.
या प्रकरणाची अधिक गंभीरता लक्षात घेऊन स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर तीन महिन्यांच्या संघर्षानंतर स्नेहालय प्रकल्पाला गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडले. या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दीपक बजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइनने अधिक पुढाकार घेतला.
पोलिसांनी मुलीला बालानगर येथून ताब्यात घेऊन पैठण पोलीस स्टेशनमध्ये आणले मात्र, “गुन्हा आमच्या हद्दीत घडला नाही” असे सांगत पोलीसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. तसेच ‘झिरो एफआयआर’ने गुन्हा दाखल करण्याची विनंतीही पोलीसांना करण्यात आली. मात्र ती सुद्धा पोलीसांकडून फेटाळण्यात आली. शेवटी या मुलीला गंगापूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी स्नेहालयच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सोशल वर्कर पूजा दहातोंडे, गंगापूर पोलीस स्टेशनची संपूर्ण यंत्रणा आणि कर्मचारी तसेच छत्रपती संभाजीनगर चाइल्ड हेल्पलाइन यांनी अथक परिश्रम घेतले.
…तर एका निष्पाप मुलीला हा संघर्ष करावा लागला नसता
या घटनेमुळे मुलीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. ‘ती’ प्रचंड तणावाखाली गेली आणि तिच्या आरोग्यावर परिणामही झाला. तरी सुद्धा प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून संवेदनशीलता दाखवली गेली नाही. या घटनेबाबत महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री ठुबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “मुलींच्या संरक्षणासाठी कायदे आहेत, पण सक्षम अधिकारी नाहीत. जर तातडीने आणि प्रभावी कारवाई झाली असती तर एका निष्पाप मुलीला हा संघर्ष करावा लागला नसता,” असेही त्यांनी यावेळी दैनिक प्रभात’शी बोलतांना सांगितले.





