Yuki Bhambri : दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या युकी भांबरीने पटकावले पहिले एटीपी विजेतेपद

दुबई : दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या युकी भांबरीने त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार अलेक्सी पोपिरिनसह जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या फिनलंडच्या हॅरी हेलिओवारा आणि ब्रिटनच्या हेन्री पेटेन यांना हरवून आपल्या पहिल्या एटीपी ५०० पुरुष दुहेरीचे विजेतेपदावर नाव कोरले. पहिला सेट गमावल्यानंतर, दोघांनीही शानदार पुनरागमन केले आणि ५१ मिनिटे चाललेल्या सामन्यात ३-६, ७-६, १०-८ असा विजय मिळवला.
या विजयासह, भांबरी सोमवारी एटीपी रँकिंगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम ४० वे स्थान मिळवेल. जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना, भांबरी आणि पोपिरिन यांनी जगातील अव्वल क्रमांकाच्या जोडी एल. साल्वाडोरच्या मार्सेलो अरेव्हालो आणि क्रोएशियाच्या मेट पाविकचा ४-६, ७-६, १०-३ असा पराभव केला. त्यांनी ब्रिटनच्या ज्युलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल यांचा ५-७, ७-६, १०-५ असा पराभव केला. पुरुष एकेरी गटात, स्टेफानोस त्सित्सिपासने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासिमेला पराभूत करून विजेतेपद जिंकले.
बोलिपल्लीला चिली ओपन दुहेरीचे विजेतेपद
सॅंटियागो येथे झालेल्या चिली ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या ऋत्विक चौधरी बोलिपल्लीने कोलंबियाच्या निकोलस बॅरिएंटोसच्या जोडीने अव्वल मानांकित अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोंझालेझ यांना सरळ सेटमध्ये हरवून जेतेपद पटकावले. ऋत्विक आणि निकोलस या बिगरमानांकित जोडीने एक तास चाललेल्या अंतिम सामन्यात गोंझालेझ आणि मोल्टेनी यांचा ६-३, ६-२ असा पराभव केला. त्याने सामन्यात ११ एस मारले तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त एकच एस मारता आला.





