IND vs ZIM 4th T20 Match Result : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना हरारे येथे पार पङला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेतील सलग तिस-या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले 153 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 15.2 षटकांतच गाठले. भारतासाठी सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वीने 53 चेंडूंचा सामना करत नाबाद 93 धावा केल्या.
त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शुभमनने 39 चेंडूंचा सामना करताना नाबाद 58 धावा केल्या. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला.
तत्पूर्वी, भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला भारताकङून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघाने वेलिंग्टन मसाकादजाच्या जागी फराज अक्रमला संघात संधी दिली.
नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर यजमान संघाने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 152 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. झिम्बाब्वे संघाकडून सिकंदर रझाने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 28 चेंडूत 46 धावा केल्या.
यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. मारुमणीने 32 धावांचे तर वेस्लीने 25 धावांचे योगदान दिले. ब्रायन बेनेट 9 धावा करून तर मेयर्स 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताकडून खलील अहमदने 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 32 धावा दिल्या. तुषार देशपांडे, शिवम दुबे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.