नॉर्थ साऊंड (अँटिग्वा): मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघास कसोटी सामने जड जाणार आहेत. याचा प्रत्यय घडवित वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविली. त्यामुळेच उपहारांपर्यंत भारताची पहिल्या डावात 24 षटकांत 3 बाद 68 अशी निराशाजनक स्थिती झाली होती.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याचा हा निर्णय सार्थ ठरविताना त्यांच्या गोलंदाजांनी भारताचे महत्त्वाचे मोहरे तंबूत धाडले. त्यांच्या द्रुतगती गोलंदाजांना खेळपट्टीची साथ लाभली. भेदक माऱ्याबरोबरच त्यांनी उसळत्या चेंडूंचाही उपयोग करीत भारतीय फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. सराव सामन्यात अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालला येथेही सूर सापडला नाही. केमार रोच याने खेळाच्या पाचव्या षटकांतच अग्रवाल व भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा यांना बाद करीत भारताच्या डावास खिंडार पाडले. यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूला द्विधा मनस्थितीत खेळताना त्यांनी यष्टीरक्षक शाय होपकडेच झेल दिला. अग्रवालने 5 धावा केल्या तर पुजारास 2 धावाच करता आल्या.
एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत लागोपाठ दोन शतके टोलविणाऱ्या विराट कोहलीकडून जबाबदारीच्या खेळाची अपेक्षा होती. मात्र त्यानेही निराशा केली. शेनॉन गॅब्रिअलच्या उसळत्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा झेल उडाला. कसोटी पदार्पण करणाऱ्या शामर्ह ब्रुक्सने सूर मारून हा झेल घेतला. कसोटीमधील त्याचा हा पहिलाच झेल त्याच्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. कोहलीने केवळ 9 धावा केल्या. तो बाद झाला त्यावेळी भारताची 3 बाद 25 अशी दयनीय स्थिती होती.
एका बाजूने आत्मविश्वासाने खेळ करणाऱ्या लोकेश राहुलने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाची घसरगुंडी थोपविली. उपहाराला त्याच्या नाबाद 37 धावा झाल्या होत्या. त्यामध्ये त्याने 4 चौकार मारले. बऱ्याच काळात कसोटीपासून दूर असल्याचा परिणाम रहाणेच्या खेळात दिसून आला. पहिल्या दोन धावा त्याने 31 चेंडूंमध्ये काढल्या. त्यानंतर त्याने दोन चौकार मारले. उपहाराला तो 10 धावांवर खेळत होता. भारताने रवीचंद्रन अश्विन व कुलदीप यादव या दोन्ही फिरकी गोलंदाजांना संधी देण्याऐवजी रवोंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूला संधी दिली.