Shreyas Iyer : केकेआरमधून रिलीज होताच श्रेयस अय्यरला मिळाली मोठी जबाबदारी, सांभाळणार ‘या’ संघाच्या कर्णधारपदाची धुरा…

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला आयपीएल 2025 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केले आहे. गेल्या मोसमातही केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पण तरीही अय्यर याला संघात कायम ठेवण्यात आले नाही. पण आता अय्यरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी मुंबईने त्याच्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे.
अय्यरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. सध्या तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. पण अय्यर देशांतर्गत सामन्यांमध्ये सतत खेळत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस ‘मधील एका बातमीनुसार, श्रेयस अय्यरला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पण याबाबात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईचा पहिला सामना गोव्याशी होणार आहे. अय्यर या स्पर्धेत खेळणार आहे. IPL 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि अय्यर याला लिलावात मोठी रक्कम मिळू शकते.
अजिंक्य रहाणे अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार…
एका सूत्राने सांगितले की, ‘सय्यद मुश्ताक अलीसाठी अय्यर मुंबई टी-20 संघाचे नेतृत्व करेल. रहाणे अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळेल कारण एमसीएला वाटते की, अय्यर या फॉर्मेटसाठी योग्य पर्याय आहे, अय्यरने रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी ट्रॉफी खेळली होती, जिथे त्याने आपल्या बॅटने शतक केले होते. तसेच अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) गेल्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यामुळेच एमसीएच्या निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
‘पृथ्वी शॉ’चाही समावेश..
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, निवड समितीने पृथ्वी शॉ यांचाही या संघात समावेश केला आहे, ज्याला रणजी ट्रॉफीतून बाहेर ठेवण्यात आले होते आणि त्याला फिटनेस सुधारण्यास सांगण्यात आले होते. एमसीएला असा विश्वास आहे की, शॉने लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे आणि तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उपयुक्त आहे.
‘दुबे-मुशीर’ला स्थान नाही..
दरम्यान, शिवम दुबे, मुशीर खान आणि तुषार देशपांडे हे अष्टपैलू खेळाडू अजूनही त्यांच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेले नाहीत आणि एमसीएने त्यांची निवड न करण्याचे हेच मुख्य कारण आहे. मुंबईचा सामना गोवा, महाराष्ट्र, केरळ, नागालँड, सर्व्हिसेस आणि आंध्र प्रदेश यांच्याशी होणार आहे.





