#BWFWorldChampionships2021 | श्रीकांतचे ऐतिहासीक रजतपदक

माद्रीद – भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याचे बीडब्ल्युएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न अपूरे राहिले. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीकांतला सिंगापूरच्या लोह किन येवकडून पराभवाचा सामना करावा लागला व रजतपदकावर समाधान मानावे लागले. भारताचा आणखी एक स्टार खेळाडू लक्ष्य सेनलाही ब्रॉंझपदकावरच समाधाना मानावे लागले.
भारताच्या बॅडमिंटनपटूने पुरुष गटात या स्पर्धेची श्रीकांतच्या रुपाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. मात्र, श्रीकांतला येव याच्याकडून 21-15, 22-20 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष गटाच्या एकेरीत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक जिंकून देण्याची श्रीकांतला संधी मिळाली होती. ही लढतही रोमहर्षक झाली. मात्र, श्रीकांतचा अनुभव काहीसा कमी पडला. पराभवातही श्रीकांतने इतिहासाची नोंद केली व रजतपदक मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू बनण्याची कामगिरी केली.
यापूर्वी 1983 साली महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोन यांनी ब्रॉंझपदक मिळवले होते. श्रीकांतने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत आपल्याच देशाच्या लक्ष्य सेन याचा 17-21, 21-14 व 21-17 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा श्रीकांत पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.
सेनला ब्रॉंझपदक
लक्ष्य सेन याला श्रीकांतकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. बीडब्ल्युएफ जागतिक स्पर्धेत कारकीर्दीत प्रथमच खेळताना लक्ष्यने अफलातून कामगिरी करत पदक जिंकले. जागतिक स्पर्धेतील एका मानाच्या समजल्या जात असलेल्या या स्पर्धेत पदार्पणातच पदक जिंकत लक्ष्यने आपल्या नावावर एक विक्रम जमा केला.





