Oscars 2025: ऑस्करच्या शर्यतीतून ‘लापता लेडीज’ बाहेर, ‘या’ हिंदी चित्रपटाकडून आशा कायम

Laapataa Ladies out of Oscars 2025: भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आलेला ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (AMPAS) बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटातील 15 शॉर्टलिस्ट चित्रपटांची यादी जारी केली आहे. मात्र, या यादीमध्ये किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाचा समावेश नाही.
आमिर खान प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेला लापता लेडीज हा चित्रपट 97व्या अकादमी पुरस्कारासाठी (Oscars 2025) बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून पाठवण्यात आला होता. मात्र, पहिल्या टप्प्यातील 15 शॉर्टलिस्ट चित्रपटांमध्ये याचा समावेश नसल्याने भारताच्या आशा संपल्या आहेत.
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटामध्ये रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रंता आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
15 चित्रपट शॉर्टलिस्ट
पहिल्या टप्प्यात शॉर्टलिस्ट झालेल्या 15 चित्रपटांमध्ये ब्रिटनकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आलेल्या ‘संतोष’ (Santosh Movie) या हिंदी चित्रपटाचा देखील समावेश आहे. याशिवाय, आय एम स्टिल हेयर (ब्राझील), यूनिव्हर्सल लँग्वेज (कॅनडा), वेव्स (चेक रिपब्लिक), द गर्ल विद द नीडल (डेनमार्क), एमिलिया पेरेज (फ्रान्स), द सीड ऑफ द सेक्रेड फिग (जर्मनी), टच (आइसलँड), नीकॅप (आयर्लंड), वर्मीग्लियो (इटली), फ्लो (लातविया), आर्मंड (नॉर्वे), फ्रॉम ग्राउंड झिरो (पॅलेस्टाइन), दाहोमी (सेनेगल) आणि हाउ टू मेक मिलियन्स बिफोर ग्रँडमा डाइस (थायलंड) या चित्रपटांचा समावेश आहे. शेवटच्या टप्प्यातील यातील 5 चित्रपटांची निवड केली जाईल.
लापता लेडीज चित्रपट ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला असला तरीही यूकेकडून पाठवण्यात आलेला हिंदी ‘संतोष’ अद्याप शर्यतीत कायम आहे. हा चित्रपट संध्या सूरी यांनी दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, 17 जानेवारीला ऑस्कर 2025 साठीच्या अंतिम नामांकित चित्रपटांची यादी जाहीर केली जाणार आहे, तर 3 मार्चला पुरस्कार सोहळा पार पडेल.





